निर्मितीपासूनच प्रकल्प रखडलेला

निर्मिती संकल्पनेपासून अडचणींमध्ये रुतलेल्या जिल्हा व्याघ्र कक्ष समितीच्या संकेतस्थळ निर्मितीला सुरुवात झाली खरी, पण दोन वर्षांहून अधिक कालावधी लोटूनही या संकेतस्थळाचा काहीच ठावठिकाणा नाही. शिकारीच्या घटना रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणून या संकेतस्थळाकडे पाहिले जात होते.

सप्टेंबर २०१२च्या अखेरीस पार पडलेल्या जिल्हा व्याघ्र कक्ष समितीच्या बैठकीत समितीचे संकेतस्थळ तयार करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला होता. या संकेतस्थळाच्या माध्यमातून शिकारीच्या घटना रोखण्यास मदत होईल, या उद्देशाने समितीचे तत्कालीन अध्यक्ष, ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. मनोज शर्मा, उपवनसंरक्षक पी.के. महाजन सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली. शिकारीसंदर्भात किंवा जंगलातील अवैध कृत्यांसंदर्भात नाव पुढे न येण्याच्या सबबीवर ज्या व्यक्ती माहिती देण्यास तयार असतात, त्यांच्यासाठी हे संकेतस्थळ अधिक उपयोगी ठरणारे होते. शिकारीच्या घटना गावालगतच्या जंगलात घडत असतात आणि गावकरी शिकारीसंदर्भात अधिक माहिती देऊ शकतात. मात्र, गावकऱ्यांना इंटरनेटचे ज्ञान असते का आणि असेल तर गावात इंटरनेटची संलग्नता असते का, असे काही प्रश्न एक-दोन सदस्यांनी उपस्थित केले. त्यानंतरच्या दोन बैठकांत यावर काहीच निर्णय झाला नाही. ऑगस्ट २०१३ मध्ये व्याघ्र कक्ष समितीचे संकेतस्थळ तयार करायचे यावर शिक्कामोर्तब झाले.

या संकेतस्थळात शिकाऱ्यांच्या छायाचित्रासह सर्व माहिती, शिकारीच्या घटना, शिकारी किंवा शिकाऱ्यांसंदर्भात कुणाला माहिती मिळाल्यास त्याचे नाव पुढे न येताही त्याला ती माहिती टाकता येणे यासारख्या अनेक विषयांचा समावेश होता. दरम्यान, समितीच्या अध्यक्षपदाची धुरा आरती सिंग यांच्याकडे आली. त्यांनीही संकेतस्थळाच्या निर्मितीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, संकेतस्थळाच्या निर्मितीसाठी लागणारा निधी कोण देणार यावरून उद्भवलेल्या अडचणींवर महाजन यांनी तोडगा काढला आणि निधीची जबाबदारी स्वीकारली. संकेतस्थळाची निर्मिती करणारे उदयन पाटील यांच्याकडे संकेतस्थळाच्या निर्मितीची सूत्रे सोपवण्यात आली. त्यांनी संकेतस्थळ कसे असेल यासंदर्भातले सादरीकरण आरती सिंग यांच्यासमोर दिले. यात कायकाय सुविधा राहतील, सामान्य माणूस माहिती कशी टाकू शकेल, बातम्या, माहिती कुठे आणि कशी असेल यासंदर्भात एक ‘नमुना संकेतस्थळ’ तयार केले. दरम्यान, महाजन यांचीही बदली झाली आणि संकेतस्थळाच्या निर्मितीचा प्रकल्पच रखडला. नवीन उपवनसंरक्षक किंवा नवीन अध्यक्ष यांनीही संकेतस्थळासंदर्भात काहीही रस दाखवले नाही. संकेतस्थळासाठी निधी आला का, आला तर त्या निधीचे काय, संकेतस्थळाची निर्मिती होणार का याची कल्पना समितीच्या इतर सदस्यांनादेखील नाही. त्यामुळे निर्मिती संकल्पनेपासूनच अडचणीत आलेले या संकेतस्थळाची निर्मिती कोणत्या टप्प्यावर आहे, यासंबंधी सर्वाचे कानावर हात आहेत.

यासंदर्भात संकेतस्थळाचे डिजायनर उदयन पाटील यांना विचारले असता त्यांनी आरती सिंग यांच्यासमोर सादरीकरण झाल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हा व्याघ्र कक्ष समितीचे अध्यक्ष, उपवनसंरक्षक यांच्याशी संपर्क साधला, पण संकेतस्थळ तयार करण्यासंदर्भात त्यांच्याकडून काहीच आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे संकेतस्थळाची निर्मिती केली नाही, असे सांगितले.