नवतपाला सुरुवात होताच चंद्रपुरातील तापमान ४७.२ अंश सेल्सिअसवर गेले असून त्याचे चटके वन्यप्राण्यांनाही बसू लागले आहेत. चिचपल्ली वनपरिक्षेत्रात एका पट्टेदार वाघिणीचा शुक्रवारी उष्माघातामुळे मृत्यू झाला. या वाघिणीचे वय अंदाजे १२ ते १४ वष्रे आहे. तिच्या शरीराचे सर्व अवयव शाबूत आहेत.

जिल्हय़ात मे महिन्यात कडक उन्ह तापत आहे. मेच्या शेवटच्या आठवडय़ात गेल्या तीन दिवसात तापमान ४७.२, ४७.० व शुक्रवारी ४६.८अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. उष्णतेमुळे लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. केवळ लोकांनाच नाही तर वन्यजीवांना देखील त्रास होत आहे. वन्यजीव जंगलात तलावाच्या काठावर वावरतांना दिसत आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने चंद्रपूर वन विभागांतर्गत असलेल्या चिचपल्ली क्षेत्रात एका पट्टेदार वाघिणीचा उष्माघाताने मृत्यू झाला. कक्ष क्रमांक ४३६ व ४५८च्या सीमेवरील नाल्यात तिचा मृतदेह मिळाला. उष्माघाताने तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. या वाघिणीचे सर्व अवयव शाबूत असल्याने घातपात किंवा शिकारीची शक्यता वन विभागाने नाकारली आहे.

केळझर उपवनक्षेत्रातील वनपाल गस्तीवर असताना त्यांना नाल्यात मृतावस्थेत वाघीण दिसली. त्यांनी या घटनेची माहिती चंद्रपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धाबेकर, ‘इको प्रो’चे बंडू धोतरे यांना दिली.

माहिती मिळताच दोघेही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वाघिणीचा मृतदेह नाल्याबाहेर काढण्यात आला. दरम्यान, गेल्या ३० दिवसांत वाघाचा हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रात जय या प्रसिध्द वाघाचा छावा श्रीनिवासनची कुंपणात वीज प्रवाह सोडून शिकार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर आता उष्माघाताने वाघिणीचा बळी घेतला आहे.