बजाजनगर-शंकरनगर- दीक्षाभूमी चौकात वाहतूक कोंडी

बजाजनगर चौक ते शंकरनगर आणि बजाजनर चौक ते दीक्षाभूमी चौक या भागात रात्री ७ ते १० वाजताच्या दरम्यान रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभे करण्यात येत असल्याने या मिनी सिव्हिल लाईन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात वाहतूक कोंडी आणि त्यातून सुटका करून घेणे अत्यंत जिकरीचे काम झाले आहे. यासाठी कारणीभूत आहेत या भागातील लॉन, हॉटेल, ढाबे. ग्राहकांच्या वाहनांची व्यवस्था न करण्यात आल्याने परिसरातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

उच्चभ्रू वस्त्यांना लागून असलेल्या काचीपुरा भागात जागा मिळेल, त्याप्रमाणे लॉन्स आणि इतर दुकाने थाटण्यात आली आहेत. वाढदिवस, स्नेहसंमेलन आदी कार्यक्रमांची रेलचेल वर्षभरच या भागात असते, परंतु उन्हाळ्याच्या दिवसात या चौकाच्या परिसरातील वाहतुकीला अधिकच अडथळा होतो. सध्या लग्न आणि स्वागत समारंभाचे दिवस असल्याने तसेच सिमेंट रस्त्यांचे काम सुरू असल्याने त्यात वाहतुकीच्या कोंडीत अधिकच भर पडते. या भागात समाजकार्य विद्यालयाचे वसतिगृह, कृषी विद्यापीठाचे गेस्ट हाऊस आणि अगदी त्याच्या आजूबाजूला हे लॉन्स आणि दुकाने सजलेली आहेत. याशिवाय शंकरनगरमध्ये भर वस्तीत लॉन्स आहेत. वस्तीमध्ये अचानक वाहनांची संख्या वाढल्याने परिसरातील लोकांना त्रास होतो. यासंदर्भात या भागातील नागरिकांनी चर्चा केल्यानंतर सर्वाधिक रस्त्याच्या बाजूला वाहने उभी करण्याची समस्या पुढे आली. शिवाय लॉन्समधील कार्यक्रमांमध्ये वाजवण्यात येणारे डीजे आणि घोषणांच्या आवाजाचा त्रास सुद्धा मोठय़ा प्रमाणात होतो. यामुळे लोकवस्तीत लॉन्स असणे योग्य की अयोग्य, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच लॉन्स, ढाबे सुरू करण्याची परवानगी घेण्यात आली काय, लॉन्सची क्षमता किती आणि वाहनतळाची व्यवस्था आहे काय, याची काळजी महापालिकेला का घ्यावीशी वाटली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

३०० रुपये भरा अन् खुशाल फटाके फोडा !- महापालिकेचा नवा नियम विवाह समारंभात वरातीच्यावेळी किंवा कुठल्याही मिरवणुकीत मोठय़ा प्रमाणात फटाक्याची आतषबाजी केली जाते. त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदुषणाचा परिणाम पशु आणि मानवी जीवनावर होतो. फटाक्यामुळे रस्त्यावर कचरा साचतो. सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावर फटाके फोडण्यास मनाई केली आहे.  मात्र महापालिकेने तीनशे रुपये शुल्क भरा आणि खुशाल फटाके फोडा असा नियम केला आहे. महापालिकेची गेल्या काही वर्षांतील आर्थिक स्थिती खालावली आहे. एलबीटीचे अनुदानही पुढच्या काळात मिळणार नाही. त्यामुळे नवीन वेगवेगळे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले जात आहेत. नागपूर शहरात मोठय़ा प्रमाणात विवाह समारंभ आणि वेगवेगळ्या समाजाच्या किंवा निवडणुकीच्या काळात मिरवणुका निघत असताना त्यात फटाक्याची आतषबाजी केली जाते. विवाह समारंभात वरात काढली जात आणि फटाकेही फोडल्या जाते. आता यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. महापालिकेच्या परवानगी न घेता फटाके फोडले तर त्यांच्यावर कारवाई आणि दंड आकारला जाईल. फटाक्यामुळे रस्त्यावर कचरा होतो. तो महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना साफ करावा लागतो. दिवाळीच्या दिवसात गल्लोगल्ली फटाक्याची आतषबाजी केली जाते. प्रत्येक वस्तीमध्ये मोठय़ा प्रमाणात त्या फटाक्याचा कचरा गोळा होत असतो. शिवाय निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराच्या मिरवणुका असो की कुठल्याही समाजाच्या, धर्माच्या मिरवणुका असो, त्यातही फटाक्याची आतषबाजी ठरलेलीच असते. त्यांना सुद्धा महापालिकेची परावनागी घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाला तीनशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे. ही परवानगी सुद्धा विवाह समारंभाच्या किंवा कुठल्याही कार्यक्रमाच्या आधी किमान दोन दिवस आधी घ्यावी लागणार आहे त्यामुळे विवाह समारंभात वरातीसाठी पोलीस विभागाची परवनागी घेत असताना फटाके फोडले जात असेल महापालिकेची परवानागी घेण्यास विसरु नका अन्यथा महापालिका प्रशासनाकडून कारवाई होऊन संबंधीताना दंड भरावा लागणार आहे.

विवाह समारंभात किंवा कुठल्याही मिरवणुकीमध्ये मोठय़ा प्रमाणात फटाक्याची आतषबाजी केली जात असताना त्याचा रस्त्यावर कचरा होत असतो आणि तो कचरा तसाच पडून राहतो. नागरिकांनी फटाके उडवताना सावधगिरी बाळगताना कचरा होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे त्यामुळे त्यामुळे फटाके फोडणाऱ्यांसाठी तीनशे रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. परवानगी न घेता फटाके फोडले तर महापालिका प्रशासन त्यांच्याकडून दंड आकारेल.

डॉ. प्रदीप दासरवार – आरोग्य अधिकारी, महापालिका

‘‘बजाजनगर चौक ते शंकरनगर मार्गावर दुतर्फा दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे लग्नसराईत या मार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होणे नित्याचीच गोष्ट झाली आहे. दीक्षाभूमी चौक ते बजाजनगर चौक तसेच शंकरनगरकडे येणाऱ्या रस्त्यावरील पाच लॉन आहेत. एवढेच नव्हे तर हॉटेल, ढाबे चालकांकडे  वाहनतळाची व्यवस्था नाही. त्यामुळे रस्त्यावरील दुतर्फा वाहनांचा त्रास परिसरातील लोकांना होतो.’’

– रेवाराम टेंभुर्णे

‘‘शंकरनगर ते लॉ कॉलेज चौक हा रस्ता ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्याचा विचार आहे. सायंकाळी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला चारचाकी वाहने उभी केली जातात आणि पार्किंग करणारे परिसरातील नागरिक, वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत असतात. या भागात वाहने उभे करण्यास मज्जाव करून नासुप्रच्या जागेवर वाहनतळ उभारण्याच्या विचाराधीन आहे.’’

– वाहतूक चेम्बर क्रमांक २ चे वाहतूक निरीक्षक लांबटे