वनमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

राज्यात लोकसहभागातून १ ते ७ जुलै २०१७ या दरम्यान चार कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार वनखात्याने केला आहे. ही मोहीम सर्वानी मिळून यशस्वी करा, असे आवाहन करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘माय प्लॅन्ट’ या भ्रमणध्वनी अ‍ॅपचे उद्घाटन केले.

वनखात्याने नियुक्त केलेल्या सर्व समन्वय अधिकाऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वनसचिव विकास खारगे यांच्यासह वनखात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वृक्ष लागवड कार्यक्रमात शासकीय विभागांना दिलेले उद्दिष्ट, त्यांची पूर्तता, लगवड करण्यात येणाऱ्या वृक्ष प्रजाती अशा सर्व कामांची माहिती वनखात्याच्या संकेतस्थळावर नोंद करण्याची सुविधा आहे. मात्र, खासगी स्वरूपात, सामाजिक, आध्यात्मिक, स्वयंसेवी संस्था, उद्योग-व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधी यांच्याकडूनही मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड होणार आहे. त्यांनी किती झाडे लावली, कोणत्या प्रजातीची लावली आणि कुठे लावली, याची माहिती वनखात्याच्या संगणक प्रणालीवर नोंदवण्याची सुविधा निर्माण करणे गरजेचे होते. ही गरज ओळखूनच वनखात्याने ‘माय प्लॅन्ट’ नावाचे अ‍ॅप तयार केले आहे. ते डाऊनलोड करून सर्व व्यक्ती आणि संस्थांना अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांनी वृक्ष लागवडीची केलेली कामे वनखात्याकडे नोंदवता येईल. अ‍ॅपवरील माहिती वनखात्याच्या संकेतस्थळावर आपोआप नोंदवली जाईल. ‘माय प्लॅन्ट’ १ ते ७ जुलै २०१७ या दरम्यान सुरू होईल. त्याचा लाभ वैयक्तिक, संस्थात्मक आणि संघटनात्मक पातळीवर वृक्ष लागवड करणाऱ्या प्रत्येकाने घ्यावा आणि वृक्ष लागवडीची माहिती शासनाकडे नोंदवावी, असेही आवाहन वनमंत्र्यांनी यावेळी केले. वृक्ष लागवडीच्या सात दिवसांच्या कालावधीत रोपांची मागणी करणारे अनेक दूरध्वनी येतील. तेव्हा प्रत्येकाने त्याला संयमाने उत्तर द्यावे. वृक्ष कुठे आणि कशा पद्धतीने मिळू शकेल याची माहिती द्यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

वृक्ष लागवडीची तयारी पूर्ण

राज्यात चार कोटी वृक्ष लागवडीची तयारी पूर्ण झाली असून आतापर्यंत चार कोटी ४१ लाख खड्डे खोदून झाले आहेत. तसेच १६ कोटीपेक्षा अधिक रोपे उपलब्ध आहेत, अशी माहिती वनखात्याचे सचिव विकास खारगे यांनी दिली. प्रत्येक विभागनिहाय दिलेले उद्दिष्ट आणि त्याची पूर्तता करताना कक्षनिहाय वृक्षलागवडीची माहिती स्वतंत्रपणे ठेवली जावी अशा सूचना त्यांनी केल्या. यात रेल्वे, संरक्षण मंत्रालयाच्या जागेवर होणारी तसेच कांदळवन क्षेत्रात होणाऱ्या वृक्ष लागवडीचा समावेश करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.