नागपूर जिल्ह्यातील कन्हानमधील ज्वेलर्सवरील दरोड्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. गोंदियातील सुर्याटोला विभागातील एका घरातून पोलिसांनी दोन दरोडेखोर आणि त्यांना आश्रय देणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. त्यांच्याकडून २ किलोचे सोन्याचे दागिने, २५ हजार रोख जप्त करण्यात आले आहे.

कन्हानमध्ये १५ मेरोजी अमित ज्वेलर्स या दुकानावर चार चोरट्यांनी दरोडा टाकला होता. दरोडेखोरांच्या गोळीबारात अमित हरिशंकर गुप्ता हे जखमी झाले होते. गुप्ता हे नेहमीप्रमाणे रविवारी दुपारी त्यांच्या दुकानात बसले असताना दुपारी दोनच्या सुमारास दोन काळ्या रंगाच्या पल्सरवरुन आलेल्या चार व्यक्तींनी दुकानात प्रवेश केला. त्यांनी चेहऱ्यावर कापडाने झाकले होते. बंदुकीचा धाक दाखवून दागिन्यांसह गल्ल्यातील रकमेची मागणी त्यांनी केली. या घटनेमुळे दुकानातील कर्मचारी घाबरले, पण मालक अमितने प्रतिकार करताच लुटारूंनी त्यांच्यावर गोळीबार केला. अमितच्या पायावर दोन गोळ्या लागल्या होत्या. या घटनेने नागपूरमध्ये खळबळ माजली होती. लुटारुंनी दुकानातील सुमारे २१ लाख रुपयांचे दागिने पळवले होते.

नागपूर आणि गोंदिया पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोमवारी कन्हानमधील दरोड्यातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या. योगेश (वय २५), नितेश उर्फ आर्यन (वय २४) आणि जितेंद्र उर्फ भुरू (वय ३५) असे या आरोपींची नावे आहेत. चोरलेले दागिने विकण्यासाठी योगेश आणि नितेश गोंदियात आले होते. तर जितेंद्रने त्यांना आश्रय दिला होता. योगेश आणि नितेशविषयी पोलिसांना माहिती मिळाली होती. गोंदियातील ज्वेलर्सच्या दुकानावरही दरोडा टाकण्याचा त्यांचा कट होता अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून एक पिस्तूल, ४ जीवंत काडतूस, चाकू जप्त करण्यात आला आहे.