दोघांच्या जुन्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्याला फुकट जीव गमवावा लागला. विरोधकास घेऊन आपल्या घरी आल्याने दोन भावडांनी मिळून मित्राचाच चाकू भोसकून खून केल्याची नंदनवन पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील सहकारनगर येथे उघडकीस आली. चंद्रशेखर मधुकर मालोदे उर्फ कमची (२७, रा. सहकारनगर) असे मरण पावलेल्याचे नाव आहे.
या खुनात नंदनवन पोलिसांनी अजय भरतलाल शाहू (२७) आणि नितेश भरतालाल शाहू (२५) दोन्ही रा. प्लॉट क्रमांक- १००, सहकारनगर, नंदनवन अशी आरोपींची नावे आहे. ९ मे २०१६ ला अजय शाहू याचे वस्तीतील चेतन सुपारे नावाच्या युवकाशी भांडण झाले. या भांडणाचा गुन्हा नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल आहे.
परंतु गेल्या काही दिवसांपासून अजय हा न्यायालयात सुनावणीस येत नव्हता. त्यामुळे चेतनने न्यायालयातील प्रकरणाचा लवकर निपटारा होण्यासाठी अजयने न्यायालयात हजेरी लावावी, अशी विनंती अजयचा मित्र चंद्रशेखर मालोदे याच्याकडे केली होती.
अजय आणि चंद्रशेखर हे दोघेही पेंटिंगचे काम करीत होते. त्यामुळे त्यांच्यात मैत्री होती. काल रविवारी सुटी असल्याने ते दारू प्यायले होते. दारू पिल्यानंतर चंद्रशेखर घरी लोळला असताना चेतन हा त्याच्या घरी आला आणि अजयला समजाविण्यासाठी त्याच्या घरी चलण्याची गळ घालू लागला. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास चंद्रशेखर आणि चेतन हे अजयच्या घरी गेले.
त्या ठिकाणी ते अजयला न्यायालयात हजर होण्याची विनंती करू लागले. दरम्यान, अजयचा लहान भाऊ नितेश हा बाहेरून घरी पतरला. चंद्रशेखर हा दारू पिऊन घरी आल्याने त्याने त्याला हटकले.
यातून त्यांच्यात वाद उद्भवला आणि ते एकमेकांना मारहाण करू लागले. चंद्रशेखरला घरासमोरच्या रस्त्यावर आणून अजय आणि नितेश मारू लागले. त्यांनी चेतनवरही हल्ला केला.
यात त्याच्या हाताला चाकू लागल्याने तो तेथून पळून गेला. या रागाच्या भरात नितेशने घरातील चाकू आणून चंद्रशेखरच्या छातीवर व पोटावर वार केले. यात रक्तबंबाळ झाला. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी अपघाताचा बनाव करीत चंद्रशेखरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णालयात (मेडिकल) दाखल केले.
डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्यानंतर दोन्ही भावंड पळून गेले. रात्री उशिरा चंद्रशेखरच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून खून असल्याचा संशय व्यक्त केला. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास केला असता पाच तासांच्या आत हा खून स्पष्ट झाला.