पाच दिवसांमध्ये दोन घटना
महिलांविरोधी अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातही अल्पवयीन मुलींना प्रामुख्याने लक्ष्य करण्यात येत आहे. पाच दिवसांपूर्वी इमामवाडा पोलीस ठाण्यातील एका आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्काराच्या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. त्या घटनेला पाच दिवस उलटत नाही तोच, नंदनवन पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात सोमवारी एका दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. शाळकरी मुलींवरील नियमित अत्याचारांच्या घटनांनी पालकांमध्ये दहशतीचे वातावरण असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच सवाल उपस्थित करण्यात येत आहे. गुंड आणि समजातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याची भीती उरली नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
राहुल बबनराव भिवगडे (२२, रा. नवीननगर, पारडी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या नातेवाईकाचे नंदनवन पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील जुना काडगंज येथील कुंभारटोली परिसरात घर आहे. पीडित मुलगी (१६ वष्रे) आपल्या आईबहिणींसह गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या घरी राहते. पीडित मुलीचे वडील काही वर्षांपूर्वी मरण पावले. पीडित मुलगी परिसरातील शाळेतच दहाव्या वर्गात शिकत असून तिला दोन मोठय़ा बहिणी आहेत. तिची आई घरकाम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करते. काल रविवारी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलीची आई आणि दोन्ही बहिणी घराबाहेर गेल्या होत्या, तर घरमालक आणि त्यांची पत्नीही घराबाहेर होती. सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आरोपी राहुल हा आपल्या नातेवाईकाकडे आला. घरात कुणीही नसताना तो थांबला आणि एका लहान मुलीमार्फत पीडित मुलीला आपल्या नातेवाईकाच्या घरात बोलावून घेतले.
पीडित मुलगी आरोपीला भावाप्रमाणे समजत होती. दादा बोलावत असल्याचे सांगण्यात आल्यामुळे ती घरात गेली. त्यावेळी आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीला वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. जीवाच्या भीतीने पीडित मुलगी शांत होती. रात्री आई आणि बहिणी घरी परतल्या. त्यावेळी पीडित मुलीच्या ओटीपोटात दुखायला लागले. त्यानंतर तिला डॉक्टरकडे उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरने औषधे दिली आणि त्या घरी परतल्या. रात्री पुन्हा मुलीच्या ओटीपोटात दुखायला लागल्याने आईने कसून चौकशी केली. त्यावेळी पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या बहिणींनी दिलेल्या तक्रार आणि वैद्यकीय तपासणी अहवालावरून नंदनवन पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत आरोपीला त्याच्या पारडी येथील घरून अटक करण्यात आली. आरोपी हा सक्करदरा येथील एका कॉस्मेटिक दुकानात काम करतो, अशी माहिती नंदनवनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.

मुलांना एकटे सोडण्याची भीती
लहान मुला-मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कामावर जात असताना घरात मुलेमुली एकटेच असतात. मात्र, लहान मुलंमुली असुरक्षित असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर त्यांना घरी एकटे सोडण्याची भीती वाटते, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यां रिना कुत्तरमारे यांनी दिली.