संगीत समारोहाचा समारोप

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील गायक, वादकांच्या तिसऱ्या पिढीतील वयाने युवा पण प्रतिभेने मोठय़ा कलाकारांनी सप्तकाच संगीत महोत्सवाचे दोन्ही दिवस गाजवले. दुसरा दिवस गायन, बासरी वादन आणि सतार वादनाने रसिकांची मने जिंकणारा ठरला.

महाराष्ट्र ललित कला निधी आणिा सप्तकच्यावतीने दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे कविकुलगुरू कालिदास ऑडिटोरीयम येथे पार पडला. पहिला दिवस पं. भीमसेन जोशी यांचे नातू व पं. श्रीनिवास जोशी यांचे शिष्य विराज जोशी तसेच, पं. शशांक कट्टी याचे शिष्य चिराग कट्टी या युवा कलावंतांनी गाजवल्यानंतर रविवारी पहिल्या सत्रात उस्ताद रशीद खान यांचे शिष्य नागेशा आडेगावकर यांनी गायनाला राग बिलासखानी तोडीने सुरुवात केली. त्यानंतर तीनतालात निबद्ध राग देशकार सादर केला. या रागात निबद्ध बंदिश जा जा रे जा ही बंदिश सादर केली. गायनाचा शेवट त्यांनी ‘का करू सजनी आये ना बालम’ या ठुमरीने केला. त्यानंतर पं. शिवकुमार शर्मा यांच्या शिष्या श्रुती अधिकारी यांचे संतूर वादन झाले. त्यांनी राग अहिरभरव सादर केला. त्यातत्यांनी आलाप, जोड, झाला, विलंबित रुपक ताल आणि तीन ताल सादर केले.

सायंकाळच्या सत्रात एस. आकाश यांचे बासरीवादन झाले. त्यांना मुकुंदराज देव यांनी तबल्यावर साथ दिली. राग शिवरंजनीने एस. आकाश या युवा बासरीवादकाने वादनाला सुरुवात केली. झपतालात निबद्ध या रागात त्यांनी केलेल्या अप्रतिम वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. शेवटी तबला आणि बासरीची अप्रतिम जुगलबंदी रंगली. गुणिजान संगीत समारोहाचा समारोप शास्त्रीय गायक आनंद बेंद्रे यांच्या गायकीने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

युवा गायक-वादकाची मैफिल 

सपाटेदार ताना, स्वरावर प्रभुत्व, सुरेल आवाज आणि किराणा घराण्याची तालीम लाभलेला विराज जोशी आणि सतारवादक शशांक कट्टी यांचे चिरंजीव चिराग कट्टी या युवा गायक-वादकाच्या मैफिलीने रसिकांची मने जिंकली. महोत्सवाचा प्रारंभ विराज जोशी यांच्या शास्त्रीय गायनाने झाला. यमन रागातील ‘कैसे सखी कैसे करिये’ या विलंबीत एकतालातील बंदिशने कार्यक्रमाचा प्रारंभ केला. भारदार आणि सुरेल आवाजाने प्रारंभी रसिकांची मने जिंकली. पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराजला किराणा घराण्याची तालीम लाभली असल्यामुळे त्याच्या गायनातून ती प्रतिबिंबीत होते.यमन रागातील द्रूत तीनतालातील बंदिश सादर केल्यानंतर पं. भीमसेन जोशी यांचा गाजलेला अभंग ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ आणि ‘बाजे मुरलिया बाजे’ हा अभंगाने भीमसेन जोशी यांच्या गायन शैलीची आठवण त्यानी रसिकांना करून दिली. विराजला तबला संगत संदेश पोपटकर आणि संवादिनीची साथसंगत श्रीकांत पिसे यांनी केली. विराजच्या शास्त्रीय गायनानंतर चिराग कट्टे या युवा कलावंताचे सतारवादन सादर झाले.