उमेदवार निवडीचा भाजपपुढे पेच

नवीन प्रभाग रचनेत विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष आणि दोन माजी स्थायी समिती अध्यक्षांचे प्रभाग त्या-त्या भागातील अन्य प्रभागात विलीन झाल्याने महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी देताना सत्ताधारी भाजपसमोर पेच निर्माण झाला असून तीन स्थायी समिती अध्यक्षांपैकी कुणाची संधी हुकणार आणि कुणाची लॉटरी लागणार याकडे लक्ष लागले आहे.

चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार साई मंदिर, जेलवार्ड आणि नरेंद्रनगर हे तीन प्रभाग मिळून दोन प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्या प्रभागांना १६ आणि ३५ क्रमांक देण्यात आला आहे. नरेंद्रनगर प्रभागाला दोन प्रभागात विभागण्यात आले आहे. नरेंद्रनगर प्रभागाचे नगरसेवक माजी स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे हे आहेत. जेलवार्डाचे नगरसेवक माजी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जोशी आहेत, तर साई मंदिर प्रभागातून वादग्रस्त नगरसेवक आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मुन्ना यादव हे आहेत.

प्रभाग क्रमांक ३५ आणि १६ मध्ये प्रत्येक दोन ओबीसी महिलांचे आरक्षण झाले आहे, तर उर्वरित दोन दोन जागांपैकी प्रत्येकी एक जागा खुल्या प्रवर्गासाठी आणि दुसरी अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. यामुळे या दोन प्रभागाचे भाजपचे दोन माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि कामगार व इतर बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव समोरासमोर आले आहेत. या दोन प्रभागात एकच खुल्या प्रवर्गातील जागा असल्याने संदीप जोशी, अविनाश ठाकरे आणि मुन्ना यादव यांच्यापैकी दोघांना संधी देता

येणे शक्य होणार आहे. त्यामुळे या तीन विद्यमान नगरसेवकांपैकी एकाची संधी हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवीन प्रभाग रचनेत महाल आणि किल्ला प्रभागाचे विलीनीकरण झाले आहे. महाल प्रभागात महापौर प्रवीण दटके आहे, तर किल्ला प्रभागात स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत आहेत.

महापौर प्रवीण दटके यांचा महाल आणि स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांचा किल्ला प्रभाग नवीन रचनेत एकत्र करण्यात आले आहेत. या प्रभागाला १८ क्रमांक देण्यात आला आहे. यात खुल्या प्रवर्गातील दोन महिलांसाठी जागा आरक्षित झाल्या आहेत. या प्रभागात एक ओबीसी आणि दुसरी खुल्या प्रवर्गातील जागा रिक्त आहे. ओबीसी प्रवर्गातील जागेवर महापौर प्रवीण दटके यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

दुसऱ्या जागेवर विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांचा पहिला दावा राहणार आहे, परंतु या प्रभागात दोघेही उमेदवार ओबीसी प्रवर्गातील होतील. त्यामुळे एका जागेवर खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला संधी देण्याची मागणी दबक्या आवाजात केली जात आहे. त्यासाठी तीन इच्छुक सज्ज झाले आहेत. यासंदर्भात बंडू राऊत म्हणाले, मी माझ्या प्रभागातून निवडणूक लढवेन. पक्षाने उमेदवारी नाकारल्यास पक्षाचे काम करेन. नामनिर्देशित सदस्य म्हणून जाणार नाही.

जोशी, ठाकरे की यादव

जेलवार्ड. साईमंदिर, नरेंद्रनगर प्रभागाचे दोन प्रभाग झाले. यामुळे माजी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जोशी, अविनाश ठाकरे आणि कामगार व बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांच्यापैकी दोघांना उमेदवारी द्यावी लागणार आहे. महापौर प्रवीण दटके यांचा महाल आणि स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांचा किल्ला प्रभाग यांचे विलीनीकरण झाले. या प्रभागात एक ओबीसी आणि एक खुल्या प्रवर्गातील उमेदवार देता येणार आहे. खुल्या प्रवर्गात दावेदार असल्याने पक्षाची चिंता वाढली आहे.