* सहा जणांनी मिळून केला युवकाचा खून *  लग्नपत्रिका वाटायला गेलेल्या तरुणाचा खून

दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या खुनाच्या घटनांनी पुन्हा शहर हादरले असून चार अल्पवयीन मुलांसह मिळून सहा जणांनी एका तरुणाचा खून केला. तर दुसऱ्या घटनेत नातेवाईकाच्या लग्नाचे पत्रिका वाटायला गेलेल्या युवकाचा खून करून तलावाच्या परिसरात मृतदेह फेकण्यात आले. या घटना वाडी आणि कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आल्या.

वाडी पोलीस ठाण्यांतर्गत रघुपतीनगर येथील रहिवासी जितेंद्र ऊर्फ कांचा महेश कौरती याचा खून करण्यात आला. तो ट्रक चालवायचा. त्याच्या खुनात महेश अशोक वरठी (२१), अंजित नागो शर्मा (१९) दोन्ही रा. रघुपतीनगर यांना अटक करून इतर चार अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. जितेंद्र आणि इतर आरोपी एकमेकांच्या परिचयाचे होते. महेश आणि एक अल्पवयीन मुलगा वाहन चालवायचे. ते वयाने लहान असल्याने जितेंद्र हा नेहमी त्यांना दारू आणण्याचे काम सांगायचा. सहा महिन्यांपूर्वी एकदा त्याने आरोपींना दारू आणण्यास पाठविले. मात्र, त्यांनी ऐकले नव्हते आणि त्यांच्याच वाद झाला. या वादानंतर जितेंद्र हा महेशला पाहून घेण्याची धमकी देत होता. त्यामुळे महेशच्या मनात भीती होती. २२ एप्रिलला रात्रीच्या सुमारास जितेंद्र हा दारूच्या नशेत झिंगला होता. त्यावेळी महेशने आपल्या इतर पाच साथीदारांच्या मदतीने त्याला पकडले आणि एमएच-३१, ईएम-१०९५ क्रमांकाच्या स्कूल बसमधून नवनीतनगर परिसरातील आयुध निर्माणीच्या उघडय़ा मैदानातील बेशरमच्या जंगलात नेले. त्या ठिकाणी त्याच्या डोक्यात दगड घातले व चाकूने वार करून खून केला. काल, शुक्रवारी परिसरात दरुगध यायला लागल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता तरुणाचा मृतदेह सापडला. परिसरातील बेपत्ता मुलांचा शोध घेतला असता त्याच्या आईने अंगातील कपडय़ांवरून त्याची ओळख पटवली. पोलिसांनी ताबडतोब चौकशी केली आणि सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांनी खुनाची माहिती दिली. त्यापैकी चौघेजण १७ वर्षांचे आहेत. एक आरोपी हा स्कूलबस चालवायचा.

लग्नपत्रिका वाटायला गेलेल्या एका तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राखड तलावाच्या परिसरात उघडकीस आली. किशोर गिरधारी टेंभुर्णे (१८) रा. खंडाळा (घटाटे) ता. पारशिवनी असे मृताचे नाव आहे.

त्याच्या मोठय़ा बहिणीच्या पुतणीचा काही दिवसांवर विवाह आहे. त्यामुळे तो लग्नपत्रिका वितरित करण्यासाठी सहकार्य करीत होता. बुधवारी संध्याकाळी ४ वाजता तो घरातून कळमेश्वर परिसरातील भरतवाडा येथे जाण्यासाठी निघाला. मात्र, घरी परतला नाही.

दरम्यान, औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षकांना तलावाच्या काठावर एका तरुणाचा मृतदेह दिसला. त्यांनी ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही.