नागपूर सुधार प्रन्यास अनभिज्ञ; कंत्राटदाराची मनमानी, ग्राहक वेठीस
शहरातील मध्यवर्ती भागात वाहनतळाची अडचण बघता व्हरायटी चौकात उभारण्यात आलेल्या ‘पार्किंग प्लाझा’मध्ये कंत्राटदार अनधिकृत बांधकाम करीत असून त्यासाठी वाहनतळ बंद करून ग्राहकांना वेठीस धरत आहे. या बांधकामाची माहितीदेखील सुधार प्रन्यासकडे नाही.
नागपूर सुधार प्रन्यासच्या या बहुमजली वाहनतळाशिवाय शहरात कुठेच अधिकृत वाहनतळ नाही. यामुळे सीताबर्डी, रामदासपेठ, बजाजनगर, धंतोली या भागात वाहन कुठे उभे करावे, असा मोठा प्रश्न पडतो. वाहन उभे करण्यास जागा मिळत नसल्याने अनेकजण त्या भागात वाहनाने जाण्याचे टाळतात. परंतु बर्डी हे व्यापारीदृष्टय़ा महत्त्वाचे ठिकाण असल्याने या भागात वाहनांची कायम गर्दी असते. वाहन उभे करण्याची थोडीफार का होईना ‘नासुप्र’च्या ‘मॅल्टी लेव्हल पार्किंग प्लाझा’मुळे सोय झाली आहे. एकमेव वाहनतळ असल्याने कंत्राटदाराच्या मनमानीचाही अनेक अनुभव आला आहे. कार वाहनधारकांची पत आणि प्रतिष्ठा बघून वाहन उभे करण्यासाठी जागा आहे किंवा नाही, याची पुष्टी त्यांच्याकडून केली जाते. ज्याची ओळख किंवा वजन नाही, अशांना वाहनांनासाठी जागा मिळेलच याची खात्री नसते.
काही दिवसांपासून येथे नवीन प्रकार सुरू झाला आहे. कंत्राटदाराने ‘नासुप्र’च्या परवानगीशिवाय बांधकाम सुरू केले आहे. त्यासाठी वाहनतळ बंद असल्याचे वाहनधारकांना सांगण्यात येत आहे. ‘नासुप्र’ने बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर व्हरायटी चौक परिसरात वाहनतळ इमारत उभारली आहे. या इमारतीचे बांधकाम राय उद्योग समूहाने केले आहे. येथे एकाचवेळी ७२ चारचाकी उभ्या केल्या जाऊ शकतात. या वाहनतळ इमारतीमध्ये १७ मजले (पार्किंग स्लॉट)असून काही भाग वाहनतळासाठी आणि काही व्यावसायिक उपयोगासाठी ठेवण्यात आला आहे. प्रत्येक मजल्यावर चार कार उभ्या केल्या जाऊ शकतात. या इमारतीसाठी सुधार प्रन्यासने जागा उपलब्ध केली आहे. इमारत बांधकाम खर्च कंत्राटदाराने केलेला आहे. त्यामुळे त्याला व्यावसायिक वापरासाठी सुमारे ४०० चौरस फूट जागा देण्यात आली आहे. कंत्राटदाराला प्रत्येक मजल्यावर एक याप्रमाणे आठ जागा देण्यात आल्या आहेत. नासुप्रने राय उद्योगकडून १.०१ कोटी रुपयांची प्रिमियम घेतली आहे. तसेच आठ जागांसाठी व्यावसायिकांकडून वार्षिक ८ लाख रुपये भूभाडे घेण्यात आले. एनआयटीकडे ६० पाकिर्ंग स्लॉट आहेत आणि खासगी विकासकाकडे १२ आहेत. खासगी कंत्राटदार हे वाहनतळ चालवत आहेत. नागपूर सुधार प्रन्यासने तीन वर्षांचा सेवा करार केला आहे. सुधार प्रन्यासने इमारतीसाठी एक पैसाही खर्च केलेला नाही. व्हरायटी चौकातील सिनेमॅक्सच्या शेजारी ६३५ चौ.मी. जमीन सुधार प्रन्यासने खासगी विकासकाला दिली आहे. करारानुसार ती इमारत सुधार प्रन्यासला हस्तांतरित केली जाईल. तसेच निविदा काढून वाहनतळाचे कंत्राट देण्यात आले आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून वाहनतळ सुरू झाले आहे. त्यामुळे येथे अतिरिक्त बांधकाम करण्याची आवश्यकता नाही. बांधकामाची माहिती देखील सुधार प्रन्यासकडे नाही.

योग्य कारवाई करणार -गुज्जलवार
या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात येईल. विनापरवाना बांधकाम होत असल्यास योग्य कारवाई करण्यात येईल, असे नागपूर सुधार प्रन्यासचे मुख्य अभियंता सुनील गुज्जलवार म्हणाले.

* व्हरायटी चौकातील ‘नासुप्र’च्या ‘मल्टी लेव्हल पार्किंग प्लाझा’मध्ये बेकायदेशीर बांधकाम.
* वाहनतळ बंद असल्याचे सांगून वाहनधारकांना त्रास देण्याचे प्रकार.
* शहरात एकमेव अधिकृत वाहनतळ.
* सुधार प्रन्यासकडे बांधकामाची माहिती नाही.