विद्यापीठ व महाविद्यालयांना रिक्त जागा भरण्याचे निर्देश द्या, राज्यपालांना साकडे

रोजगार मिळत नाही, बेरोजगारी वाढली, प्राध्यापकांची जागा लाखो रुपयांना विकली जाते, हे विषय चर्चिले जातात पण, गेल्या काही वर्षांमध्ये विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये जाहिराती देऊन केवळ नोकर भरतीचे नाटक केले जात असून समाजात बेरोजगारी वाढवण्यासाठी मदतच केली जात असल्याचा गंभीर आरोप करून विद्यापीठ व महाविद्यालयांना रिक्त जागा भरण्याचे निर्देश द्या, असे साकडेच राज्यपालांना घालण्यात आले.

विद्यार्थी पदवी घेतात, नोकऱ्यांसाठी अर्ज भरतात, पण नोकऱ्या मिळत नाहीत. कारण निवड प्रक्रियाच राबवली जात नाही. अनेकदा निवड प्रक्रिया राबवल्याचा केवळ देखावा केला जातो आणि ‘सुटेबल कॅंडिडेट नॉट फाउंड’चा शेरा मारून संबंधित निवड प्रक्रिया बासनात गुंडाळली जाते. बेरोजगारांच्या हातांना कामे नाहीत, अशी सर्वत्र ओरडच नव्हे तर परिस्थिती असतानाही राज्यातील वेगवेगळ्या विद्यापीठांद्वारे गेल्या तीन चार वषार्ंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली नाही. मात्र, विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या जागा त्वरित भरण्याचा प्रयत्न केला जातो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०१३मध्ये १००च्यावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जाहिरात दिली होती. मात्र, अद्यापही ती रिक्त पदे भरली नाहीत.

एकीकडे कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानांतर्गत (रुसा) विद्यार्थ्यांच्या क्षमता बांधणीसाठी हुशार, गुणवत्तायुक्त शिक्षकांच्या भरतीवर भर दिला आहे तर दुसरीकडे महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या पातळीवर तेच होताना दिसत नाही. त्यामुळे केंद्र शासनाला अपेक्षित संशोधन, विकास, विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास हे विषय बाजूला फेकले जातात.

महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये निवड प्रक्रियाचा कार्यक्रम योग्य पद्धतीने राबवला जात नाही.

जेव्हा वाटले तेव्हा जाहिरात द्यायची आणि जेव्हा वाटले तेव्हा प्रक्रिया बंद ठेवायची किंवा पुढे ढकलायची, असे धोरण बहुतेक विद्यापीठांमध्ये राबवले जात आहे.

विद्यापीठांकडून उमेदवारांची फसगत

शिक्षक व शिक्षकेतरांची भरती होणे आवश्यक असून आज एका पदासाठी ४० लक्ष रुपयांची मागणी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये करण्यात येते. त्यातून खरोखर प्रामाणिक, हुशार आणि गुणवत्ता प्रचूर शिक्षकांची अपेक्षा कशी काय करू शकतो? हे सत्य सर्वानाच माहिती आहे पण या व्यवहाराचे पुरावे नसले तरी व्यवस्थापनाकडून शिक्षकांची बोली लावली जाते, ही बाब गंभीर आहे. त्यामुळेच चांगले मनुष्यबळ शिक्षण क्षेत्राला मिळत तर नाहीच पण, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची साधी तंत्रज्ञाची पदे न भरल्याने तेवढे लोक रोजगाराला मुकले आहेत. विद्यापीठांच्या जाहिराती एकतर काढल्या जात नाहीत किंवा खूप कमी प्रमाणात प्रसिद्ध होतात. त्यात वर्षांनुवर्षे त्या जागा भरल्या जात नसल्याने उमेदवारांच्या अर्जावर विद्यापीठांनी नेमकी काय भूमिका घेतली, हे समजत नाही. एवढा खर्च करून उमेदवार अर्ज करतात. मात्र, त्या अर्जाचे नेमके काय होते, हे सांगण्याची तसदी देखील विद्यापीठ, महाविद्यालये घेत नसतील तर ती सरळसरळ त्यांची फसगत आहे.

– डॉ. संजय खडक्कार – व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य, नागपूर विद्यापीठ.

‘त्या’ जाहिरातीचे काय झाले?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी २९ जून २०१३ला जाहिरात दिली होती. नाशिकच्या शिक्षकपदासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने मार्च २०१६मध्ये जाहिरात दिली होती. तसेच अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मनुष्यबळ विकास केंद्राच्या उपसंचालकपदाची जाहिरात डिसेंबर २०१५मध्ये वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, या जाहिरातींचे पुढे काय झाले, याची कोणतीही माहिती अर्जकर्त्यां उमेदवारांपर्यंत पोहोचवली नाही.