उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी विनंती, रखडलेल्या निकालांसाठी उपाय

ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या पहिल्याच अनुभवात गारद झालेल्या मुंबई विद्यापीठाला जुलै अखेरीस निकाल लावण्याचे उद्दिष्ट साधण्यासाठी नागपूर विद्यापीठाकडे धाव घ्यावी लागली आहे. निकाल रखडल्याच्या पाश्र्वभूमीवर संकटात सापडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका नागपूर विद्यापीठ तपासून देणार असून येत्या आठ-दहा दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्याकडून यासंदर्भात पत्र प्राप्त झाले आहे. दोन्ही कुलगुरूंची मुंबई विद्यापीठात कुलगुरूंच्या दालनात बुधवारी याबाबत चर्चाही झाली. एव्हाना नागपूर विद्यापीठाचे जवळपास बहुतेक परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राध्यापकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडणार नसल्याचा दावा कुलगुरूंनी केला आहे.

नागपूर विद्यापीठ एक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी १० रुपये देते तर मुंबई विद्यापीठ एका उत्तरपत्रिकेमागे प्राध्यापकांना २० रुपये मानधन देते. परीक्षांचे निकाल येत्या ३१  जुलैपर्यंत जाहीर करण्याचे कुलपतींचे मुंबई विद्यापीठाला निर्देश असल्याने युद्धपातळीवर मूल्यांकनाचे काम करण्यात येणार आहे.

मूल्यांकन कसे?

नागपूर विद्यापीठ जवळपास दीड ते दोन लक्ष उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणार आहे. या सर्व उत्तरपत्रिका मुंबई विद्यापीठ ‘सॉफ्टकॉपी’मध्ये पाठवणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकांसाठी मूल्यांकनाचे काम ऐच्छिक असणार आहे. विद्यापीठाकडून आधी मान्यताप्राप्त प्राध्यापकांची यादी मुंबई विद्यापीठाला पाठवण्यात येईल. यादीतील प्राध्यापकांना मान्यता दिल्यानंतर मूल्यांकनाचे काम सुरू होईल.

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या विनंतीला मान देत आम्ही उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाच्या कामात मदत करणार आहोत. संकटाच्या वेळी एक राज्य जसे दुसऱ्या राज्याला मदत करते तसेच हे आहे. त्यासाठी नागपूर आणि मुंबई विद्यापीठातील प्रतिनिधींची संयुक्त समन्वय समिती येत्या दोन दिवसांत स्थापन करण्यात येणार आहे. औपचारिकता पूर्ण करून येत्या दोन दिवसांत मूल्यांकनाच्या कामाला सुरुवात होईल. डॉ. सिद्धार्थ काणे, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ