* नागपूर ग्रामीण पोलिसांची ‘तक्रारमुक्त’ पोलीस भरती
* उमेदवारांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘हेल्पलाईन’
दरवर्षी पोलीस भरतीदरम्यान उमेदवारांच्या अनेक तक्रारी प्राप्त होतात. या तक्रारींचे निराकरण करून वेळीच त्यांचे समाधान केले नाही तर पोलीस भरती प्रक्रियेवर आरोप होत असल्याचा पुर्वानुभव लक्षात घेऊन नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी एक ‘सॉफ्टवेअर’ विकसित करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रोजच्या ताज्या घडामोडी उमेदवारांना मिळत आहे.
जळगाव येथील ‘सिद्धी सॉफ्टवेअर’ या कंपनीने नागपूर ग्रामीण पोलीस भरतीसाठी हे सॉफ्टवेअर विकसित केले. उमेदवाराने महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर भरलेली इत्थंभूत माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘एमएस-एक्सेल’ फॉरमॅटमध्ये प्राप्त झाली. ही माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘सिद्धी सॉफ्टवेअर’मध्ये अपलोड केली. त्यानंतर पोलीस भरतीसाठी आवश्यक दस्तावेजांची माहिती देणारे फलक भरती मैदानाच्या प्रवेशदारापासून ते दस्तावेजांची तपासणी करणाऱ्या ठिकाणी लावण्यात आले आहे.
हे फलक अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक आणि उपअधीक्षकांसह प्रत्येक अधिकाऱ्यांजवळ बैठकीच्या ठिकाणी लावण्यात आले. यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवार यांच्यात संभ्रम निर्माण होणार नाही, ही दक्षता बाळगण्यात आली.
दस्तावेज तपासणीनंतर पात्र आणि अपात्रतेचे पत्र उमेदवारांना देण्यात आले. अपात्र ठरविण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या पत्रावर ते का अपात्र ठरले, याचे कारण स्पष्ट करण्यात येते. त्यामुळे उमेदवारांचे ताबडतोब समाधान होते.
दस्तावेज तपासताना कर्मचाऱ्यांकडून चुका होऊ शकतात, त्यामुळे ते दस्तावेज पुन्हा-पुन्हा दोन ते तीन काऊंटरवरून तपासण्यात आले. शिवाय सॉफ्टवेअरमध्ये पात्र-अपात्र अशा दोन्हींची माहिती अपलोड करण्यात आली. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवाराला अपील मागायला येऊ शकत असल्याचे सर्व प्रक्रिया ही व्हीडिओ कॅमेऱ्यात कैद करण्यात येत आहे. २९ मार्चपासून भरती प्रक्रिया प्रारंभ झाली. भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी लेखी परीक्षेचा दिनांक जाहीर करण्यात आला. या सॉफ्टवेअरमध्ये दररोजच्या शारीरिक चाचणीचे निकाल जाहीर करण्यात येतात.
शिवाय हेच निकाल संध्याकाळी मैदानाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात येत आहेत. उमेदवाराला आपल्या निकालासंदर्भात काहीही शंका असल्यास तो ताबडतोब तक्रार निवारण कक्षाकडे (समाधान कक्ष) अर्ज करू शकतो.
त्यासाठी दोन हेल्पलाईन क्रमांक आणि तीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी विद्यार्थ्यांचे अर्ज आणि ऑनलाईन  डेटा तपासून ताबडतोब दुरुस्ती करतात.

कारागृह, ग्रामीणसाठी शिपायांची भरती
नागपूर ग्रामीण अधीक्षक कार्यालयातर्फे नागपूर मध्यवर्ती कारागृहातील रक्षक पदाच्या १२५ जागा आणि नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत ९६ जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. यासाठी ३७ हजारांवर उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी ३५ हजार ३५२ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यांची शारीरिक चाचणी सुरू आहे. १२ मे ला सकाळी ५ वाजता उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

चूक करणाऱ्यांना ताबडतोब ‘नोटीस’
मनुष्याकडून चुका होणे हे अपेक्षित आहे. परंतु पोलीस भरती प्रक्रिया ही बिनचूकपणे व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे उमेदवारांचे अर्ज आणि दस्तावेज तपासताना कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांकडून चूक झाली तर ती संगणकात स्पष्ट होते. ही बाब लक्षात आल्यानंतर ताबडतोब संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे. आतापर्यंत अनेकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
– अनंत रोकडे, पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण