काँग्रेस नेते पी. एल. पुनिया यांचे मत

देशात दररोज सरासरी ३५ शेतकरी आत्महत्या करीत असून महाराष्ट्रातील स्थिती सर्वाधिक भीषण आहे. एकूण आत्महत्यांच्या ३७ टक्के आत्महत्या एकटय़ा महाराष्ट्रात होत असल्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची खरी गरज उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात आहे, असे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता व खासदार पी.एल. पुनिया म्हणाले.

मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील कृषी क्षेत्राच्या दुरवस्था पुनिया यांनी सोमवारी नागपुरात सादर केली. शेतकरी कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे निराश असून आत्महत्या करीत आहे. २०१५ मध्ये १२ हजार ६०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ७२ टक्के शेतकरी २ हेक्टरपेक्षा कमी शेती असलेले आहेत. महाराष्ट्रात जानेवारी २०१७ मध्ये २०२, फेब्रुवारीमध्ये २०२ आणि मार्चमध्ये २२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या तीन महिन्यात ६२९ आत्महत्या झाल्या. सरकारने त्यातील २२४ प्रकरणात अर्थसहाय दिले. १३८ प्रकरणे नाकारण्यात आली आणि २६७ प्रकरणांची छाननी केली जात आहे.

या राज्यात दुष्काळ, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येथे कर्जमाफीची खरी आवश्यकता आहे, असे पुनिया म्हणाले.

उद्योगपतींना माफी,शेतकऱ्यांना नकार

भाजप सरकारने काही निवडक उद्योगपतीचे १ लाख ५४ हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ केले आहे. दुसरीकडे कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास नकार देत आहे, असे पुनिया म्हणाले.