संघाच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा; जिल्हावार नियुक्तीचा प्रस्ताव

तथाकथित गोसेवकांकडून होणाऱ्या हिंसाचारामुळे संघ परिवारातील संघटनांची होणारी बदनामी टाळण्यासाठी विश्व हिंदू परिषद आता जिल्हा आणि तालुकापातळीवर अधिकृत गोसेवक नियुक्त करणार आहे. नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या संघाच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर चर्चाही करण्यात आली.

तथाकथित गोरक्षकांकडून होणारे हल्ले आणि त्यामागे संघ वर्तुळातील संघटनांचा हात असल्याचा होणारा आरोप लक्षात घेता विहिंपचा हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर देशभरात भाकड गायींची वाहतूक करणाऱ्यांवर तसेच गोमांस बाळगणाऱ्यांवर तथाकथित गोरक्षकांकडून हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या हल्ल्यांमागे संघ परिवारातील संघटनांचा (उदा. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल) हात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातो. संघ परिवाराकडून याचे खंडनही केले जाते. मात्र, यामुळे संघ परिवार व त्यांच्याशी संबंधित संघटनांची बदनामी होत आहे. ही बाब लक्षात घेऊनच विहिंप जिल्हा आणि तालुका पातळीवर गोसेवक नियुक्त करणार आहे.

विहिंपच्या दाव्यानुसार गोहत्या रोखण्यासाठी तसेच गायी कत्तलखान्यात नेण्यापासून रोखण्यासाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते ग्रामीण भागात काम करीत आहेत. संघटनेतर्फे संचालित गोविज्ञान अनुसंधान केंद्राच्या माध्यमातून देवलापारमध्ये गोशाळा सुरू आहे. त्या ठिकाणी हजारो गायीचे पालनपोषण केले जात आहे. काही तथाकथित गोरक्षक बजरंग दलाच्या नावाखाली गोमांस घेऊन जाणाऱ्यांवर हल्ले करतात. नागपूर जिल्ह्य़ात अलीकडेच अशाच प्रकारच्या एका घटनेत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग उघड झाला होता.

गोसेवक कोण?

गोसेवक बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील व त्यांना वििहपकडून ओळखपत्रही दिले जाईल. यासंदर्भातील प्रस्ताव संघटनेच्या बैठकीत ठेवला जाणार असून तेथे यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे. यासंदर्भात नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील विविध संघटनांच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा झाली. गोहत्या बंदी, गोशाळा या विषयांचाही त्यात समावेश होता.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नावाखाली काही तथाकथित गो-रक्षकांचा वावर वाढला असून त्यांच्यामुळे संघटना बदनाम होत आहे. त्याला आवर घालण्यासाठी स्थानिक पातळीवर गोसेवक नियुक्तीचा प्रस्ताव आहे. विहिंपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत हा विषय ठेवला जाणार आहे.’

हेमंत जांभेकर, प्रदेश उपाध्यक्ष विहिंप