स्वतंत्र राज्याकरिता विदर्भवाद्यांचे धरणे

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरिता वेगवेगळ्या विदर्भवादी संघटनेच्या वतीने नुकतेच नागपूरच्या मानस चौक येथील सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्या शेजारी धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आंदोलकांनी ‘आपली पोळी, आपले राज्य, घेऊन राहू विदर्भ राज्य’सह विविध घोषणा देऊन निदर्शने करून मागण्या लावून धरल्या.

मानस चौकात सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या आंदोलनात अखिल हिंदू फॉरवर्ड ब्लॉक या पक्षासह श्रीराम सेना, मुस्लिम लिगसह इतर बऱ्याच संघटना सहभागी झाल्या होत्या. विदर्भवाद्यांच्या या आंदोलनाकरिता पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परंतु त्यानंतरही स्वतंत्र विदर्भाकरिता विदर्भवाद्यांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व विदर्भवादी जांबुवंतराव धोटे यांनी केले.

धरणे आंदोलनात ‘स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे’ यासाठी शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या वक्तव्यावरील गदारोळ आणि टीका करणाऱ्यांचा निषेध करण्यात आला. आंदोलनात विदर्भवादी नेते सहभागी झाले होते.