*  विजय लिमये यांचे मत  *  लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

पर्यावरणाचा कळवळा सारेच आणतात, पण हा कळवळा कृतीत उतरवणारी माणसे फारच थोडी असतात. त्याचवेळी पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात आपण सारेच आघाडीवर असतो. मृत्यूशय्येवर असतानाही पर्यावरणाचा ऱ्हास करीतच माणूस जातो. मात्र, जाताजाता तरी पर्यावरणाचा विचार माणसाने करावा म्हणून काही व्यक्ती सातत्याने धडपड करीत असतात. खरे तर अंत्यसंस्काराच्या वेळी एखाद्याला पर्यावरणाचे ज्ञान देणे म्हणजे अंगावर संकट ओढवून घेण्यासारखे, पण विजय लिमये यांनी हे  संकट ओढवून घेतले आणि आता मृत्यूशय्येवर असतानाही पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या व्यक्तीचा पर्यावरण रक्षणात हातभार लावतात. या व्यक्तिमत्त्वाने मंगळवारी लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत पर्यावरणपुरक अंत्यसंस्काराची पोतडी उघडली.

नागपुरात काही वर्षांपूर्वी पर्यावरणपुरक अंत्यसंस्काराची संकल्पना मांडली तेव्हा अनेकांनी ते ऐकून घेण्यासही नकार दिला. दिवसभर घाटावर ठाण मांडायचे आणि लाकडावर केले जाणारे अंत्यसंस्कार पर्यावरणासाठी किती घातक आहेत ते त्यांना समजावून सांगणे म्हणजे मोठे आव्हान! कारण त्यावेळी उपदेश ऐकून घेण्याची कुणाची मन:स्थिती नसते. सुरुवात केली आणि हळूहळू त्यात यश येत गेले. पर्यावरणासाठी काम करणारे अनेक स्वयंसेवी आहेत, पण लाकडावर होणाऱ्या अंत्यसंस्कारातूनही पर्यावरणाचा ऱ्हास होतो याकडे मुळातच कुणी वळले नव्हते. त्यामुळे ‘नेव्ही’तून निवृत्त होताना आधी याच कठीण विषयाला हात घातला. अंत्यसंस्कार लाकडे जाळूनच करावे असे कोणत्याही वेद, पुराणात लिहिलेले नाही. तरीही भारतात अंत्यसंस्कार लाकडावरच केले जातात आणि लाखो वृक्षांचा बळी त्यात दिला जातो. एकटय़ा नागपूर शहराचा विचार केला तर सुमारे २० हजार लोकांवर दरवर्षी अंत्यसंस्कार केले जातात आणि त्यासाठी ४० हजार वृक्षे बळी पडतात. म्हणजेच झाडांची कत्तल करून पर्यावरण प्रदूषण आणि लाकडे जाळून पुन्हा एकदा प्रदूषण!

कोल्हापूर, सातारा या परिसरात गोवऱ्यांवर अंत्यसंस्काराची प्रथा आहे. हीच प्रथा नागपुरात सुरू करायची तर त्यावेळची लोकांची मन:स्थिती आणि त्याचवेळी लाकूड विक्रेत्यांची लॉबी! अशा दोन्ही पातळीवर पर्यावरण रक्षणासाठी लढा द्यायचा होता. सुरुवातीला ‘एलपीजी’ची दाहिनी आणि नंतर हळूहळू गोवरी दहनाकडे लोकांना वळवले. त्यातून पर्यावरण रक्षणाचा उद्देश सार्थ झालाच, पण त्याचवेळी गोवरी तयार करण्याचा आणि त्यातून गावकऱ्यांना अर्थार्जनाचा उद्देशही सार्थ झाला. सुरुवातीला महिन्यातून १५ ते २० अंत्यसंस्कार गोवरीवर केले जात आता ही संख्या ४० ते ४५ वर गेली आहे. पावसाळयात गोवरी तयार होणे अशक्य असते. त्यामुळे त्यावरही पर्याय शोधला. शेतीतून पीक काढल्यानंतर वाया जाणारा कचरा शेतकरी जाळत होते, पण त्याच कचऱ्यापासून आता मोक्षकाष्ठ तयार केले जातात आणि त्यावरही अंत्यसंस्काराची सुरुवात झाली आहे. एका अंत्यसंस्काराकरिता सुमारे २२५ किलो मोक्षकाष्ठ आणि २५ किलो गोवरीचा वापर केला जातो. पर्यावरणपुरक अंत्यसंस्काराचा हा मार्गही नागपूरकरांनी स्वीकारला आहे. काही वर्षांपूर्वी पर्यावरण रक्षणासाठी सुरू केलेल्या या चळवळीला नागरिकांच्या सहकार्यामुळे बळ मिळाले आहे, असे विजय लिमये यांनी सांगितले.

अंबाझरी, मानेवाडा, सहकारनगर घाटावर गोवरी आणि मोक्षकाष्टचा वापर अंत्यसंस्कारासाठी आता मोठय़ा प्रमाणावर सुरू झाला आहे. पर्यावरणपुरक अंत्यसंस्कार करणाऱ्यांना विजय लिमये यांच्या इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनकडून श्रद्धांजली पत्र पाठवले जाते. हळूहळू सर्वच शहरात पर्यावरणपुरक अंत्यसंस्काराचा प्रसार होऊ लागला असून यवतमाळ जिल्ह्यतही ती सुरुवात झाली आहे