काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि पक्षाचा कार्यकर्ता नरेंद्र जिचकार यांच्यात मंगळवारी झालेल्या हाणामारीची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू असताना नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी मात्र या विषयावर मौन बाळगणेच पसंत केले आहे.
शहराध्यक्ष आणि विरोधीपक्ष नेतेपद विकास ठाकरे यांच्याकडे आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांचे ते कट्टर समर्थक आहेत. जिचकार कुटुंबीयांचे मुत्तेमवार यांच्या गटाशी फारसे सौख्य राहिले नाही. जिचकार कुटुंबीयांनी राजकीय आणि व्यावसायिक लाभासाठी वेळप्रसंगी भाजपला साथ दिल्याचा आरोप विरोधी गटात करत आले आहेत. विकास ठाकरे यांनी जिचकार कुटुंबीयांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळणार नाही यासाठी प्रयत्न केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मुत्तेमवार आणि जिचकार यांच्या गटातील हा वाद जुना आहे. या वादाला मंगळवारी झालेल्या हाणामारीनंतर वेगळे वळण मिळाले आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल घडलेल्या या घटनेवर शहरातील काँग्रेसचा एकही नेता उघडपणे बोलण्यास तयार नाही.
‘मी गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहे. नागपुरातील या घटनेबद्दल भ्रमणध्वनीवरून मी माहिती घेतली. विकास ठाकरे आणि अतुल लोंढे विमानतळावर बसले असताना नरू जिचकार यांनी वाद घातला. काँग्रेस बरबाद केली.. काँग्रेस बरबाद केली असे म्हणून नरू शिवीगाळ करत होता, असे कळले. जो पक्षात काहीच नाही अशा व्यक्तीने घातलेल्या वादावर मला प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. नागपुरात आल्यावर संपूर्ण माहिती घेऊन त्यावर बोलता येईल’, असे सांगून माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यापूर्वी देखील काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचे वाद सार्वजनिक ठिकाणी झाले आहे. युवक काँग्रेसचा तत्कालीन पदाधिकारी सन्मुख मिश्रा यांच्याशी तर विमानतळावर वाद झाला होता. दिवंगत विलास देशमुख हे मुख्यमंत्री असताना शहरातील एका हॉटेलमध्ये माजी आमदार अशोक धवड यांच्याशी देखील भांडणे झाले होते. त्यामुळे काँग्रेसला सार्वजनिक परस्परातील मतभेद चव्हाटय़ावर आणण्यासाठी विरोधकांची आवश्यकता कधीच भासली नाही. यावेळी मात्र काँग्रेसमध्ये विचित्र स्थिती असून घडून गेलेल्या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास नेते मागे-पुढे पाहत आहे.
यासंदर्भात माजी मंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, ‘जिल्हा पातळीवरील या प्रकरणात मी काय प्रतिक्रिया देणार. हवे तर स्थानिक नगरसेवकांची प्रतिक्रिया घ्या’, असे सांगून या विषयावर अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले.
‘माझा स्वभाव माहिती आहे ना, मी अशा भानगडीत पडत नाही. यावर माझी प्रतिक्रिया घेऊ नका. मी प्रतिक्रिया देईन आणि उगीच गैरसमज निर्माण होतील. त्यामुळे या विषयावर मी बोलणार नाही’, असे सांगत माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. याबाबत राज्याचे माजी मंत्री अनीस महमद यांनी देखील या प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगून काही भाष्य करण्यास असमर्थता दर्शवली. ‘मी वैयक्तिक कामामिनित्त दिल्लीत आहे. नागपूर विमानतळावर काय घडले हे मला माहिती नाही. नागपुरात काँग्रेसचे अनेक मोठे नेते आहेत. तेच या प्रकरणाबद्दल काही सांगू शकतील’, असे अहमद म्हणाले.