बांधकामात नियोजन धाब्यावर; व्हीआयपी मार्ग निम्माच सिमेंटचा

महापालिकेने सिमेंट काँक्रिट रस्ते बांधणीचा प्रकल्प कोणतेही पूर्वनियोजन न करता हाती घेतल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. रस्त्याखालील जलवाहिन्या, केबल न हलवता त्याऐवजी सिमेंट काँक्रिटचा रस्ताच अरुंद केला जात असून त्याचे मोजमाप अधिकाऱ्यांच्या हाती असल्याने हे काम त्यांच्या व कंत्राटदारांच्या फायद्याचेच ठरत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या व्हीआयपी मार्गाखाली जलवाहिनी असल्याने रस्ता अर्धा सिमेंट काँक्रिटचा आणि अर्धा पेव्हर ब्लॉक्स टाकून करण्यात आला आहे.

डांबरी रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीवरील वारंवार होणारा खर्च टाळण्यासाठी सिमेंट रस्ते केले जात असून ते ५० वर्षे टिकतील, असा दावा केला जात आहे. पहिल्या दोन टप्प्यातील सुमारे ३०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. रस्ते तयार करताना त्याखालील जलवाहिन्या आणि केबल काढण्याचे नियोजन महापालिकेने केले नाही.

रस्त्यांच्या मधोमध असलेल्या जलवाहिन्या रस्त्यांच्या कडेला नेणे किंवा सव्‍‌र्हिस डक्ट तयार करून रस्ता बांधणे हा उपाय असताना अर्धा रस्ता सिमेंटचा आणि अर्धा पेव्हर ब्लॉक्सचा करण्यात आला आहे. त्यामुळे कंत्राटदाराचा सिमेंट काँक्रिटसाठी लागणारा खर्च वाचला. झालेल्या कामाचे मोजमाप अधिकाऱ्यांना करायचे आहे. त्यानंतर कंत्राटदाराचे देयकं निघणार आहेत.

म्हणजेच जलवाहिन्या, केबल हे देखील अधिकारी आणि कंत्राटादार यांना लाभ मिळवून देणारे ठरले आहेत. या रस्त्यांची निविदा पूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्याची आहे हे येथे उल्लेखनीय.

आयुक्तांच्या चौकशीचे आश्वासनाचे काय

सिमेंट काँक्रिट रस्त्यांना अल्पावधीत तडे जाणे, पेव्हर ब्लॉक तुटणे, असमतल रस्त्यांमुळे अपघाताला निमंत्रणे मिळणे, पाण्याचा निचऱ्याची व्यवस्था नसणे, रस्ता दुभाजकाचा निकृष्ट दर्जा आदी मुद्दे जनमंचने उपस्थित केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी चौकशीची हमी दिली, परंतु जनमंचच्या प्रतिनिधीला न घेताच त्रयस्थामार्फत चौकशीच्या नावाखाली महापालिकेच्या सिमेंट रस्ते प्रकल्पाच्या सल्लागाराकडून गुणवत्ता तपासण्यात येत आहे. यावर आक्षेप घेत जनमंचने त्रयस्थ चौकशीचे काय झाले, अशी विचारणा महापालिका आयुक्त अश्विन मुदगल यांना पत्राद्वारे केली. आयुक्तांनी त्या पत्राला उत्तर दिले नाही. यामुळे जनमंचच्या शनिवारच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार असून पुढील कार्यक्रम आखण्यात येणार आहे.

जडवाहनांमुळे रस्ते उखडणार

‘पेव्हर ब्लॉक्स’ पायी चालण्याच्या जागेवर बसवण्यात येतात. त्यादृष्टीने ते तयार केले जातात, परंतु स्मार्ट सिटी होऊ पाहत असलेल्या नागपुरात ‘पेव्हर ब्लॉक्स’ वरून जड वाहने चालवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हीआयपी मार्ग अर्धाअधिक पेव्हर ब्लॉकचा तयार करण्यात आला. हे ‘ब्लॉक्स’ वाहनांच्या भारामुळे तुटतील आणि पूर्वीप्रमाणेच दरवर्षी ते बदलण्यात येतील. महापालिकेच्या अशाप्रकारच्या रस्ते बांधणीवर टीका होत आहे.

व्हीआयपी रस्त्याखाली मोठी जलवाहिनी आहे. त्यावर सिमेंट काँक्रिट टाकता येत नाही. त्यामुळे अध्र्या रस्त्यावर सिमेंट काँक्रिट करण्यात आले आणि अर्धा रस्ता पेव्हर ब्लॉक (गट्टू) वापरून तयार करण्यात आला आहे. या रस्त्याचे किंवा अशी परिस्थिती जेथे कुठे आली असेल तेथे बांधकामाच्या अंदाजित किमतीचे पुनर्विलोकन केले जाईल.’’

एम.जी. कुकरेजा, कार्यकारी अभियंता, लोककर्म विभाग, नागपूर महापालिका