विदर्भातून एकही प्रस्ताव नाही
मराठी साहित्य महामंडळाकडे यंदा साहित्य संमेलनासाठी कल्याणचे सार्वजनिक वाचनालय, डोंबिवलीतून आग्री युथ फोरम आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, साताऱ्याची शाहुपुरी शाखा अशी तीन ठिकाणची निमंत्रणे आली आहेत. महामंडळाचे कार्यालय नागपुरात असताना विदर्भातून मात्र एकही प्रस्ताव समोर आलेला नाही.
अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय नुकतेच विदर्भ साहित्य संघात आले असून, महामंडळाचे काम सुरू झाले आहे. गेल्या काही वर्षांंत साहित्य संमेलन कुठे व्हावे आणि ते कशा पद्धतीने व्हावे हा साहित्य वर्तुळात वाद आणि टीकेचा विषय ठरला आहे. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी अध्यक्ष होण्यापूर्वी महामंडळाला १६ कलमी कार्यक्रम पाठवून साहित्य संमेलनावर कोटय़वधी रुपये खर्च करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र, महामंडळाच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर मात्र संमेलन दरवर्षी होणार असल्याचे जाहीर करून ते कशा पद्धतीने व्हावे, याचा निर्णय महामंडळ घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नागपूरला २००७ मध्ये घेण्यात आलेले संमेलन ७५ लाखांत करण्यात आले होते. त्यानंतर सांगलीचे संमेलन २ कोटींच्या घरात गेल्यानंतर दरवर्षीच संमेलनाचा खर्च कोटीने वाढत गेला. पिंपरी-चिंचवडच्या संमेलनाचा तर खर्च १० ते १२ कोटींच्या घरात झाला. गेल्या काही वर्षांंत संमेलन किती भपकेबाज आणि भव्यदिव्य करता येईल याची जणू स्पर्धा सुरू झाली. आता महामंडळाचे कार्यालय आता नागपुरात आल्यानंतर त्याला आळा बसावा आणि त्याचे स्वरूप मर्यादित खर्चाचे असावे, अशी भूमिका महामंडळाचे अध्यक्ष डॉ. जोशी यांनी घेतली.
विदर्भ साहित्य संघाने २००७ मध्ये पुढाकार घेऊन ८० वे व त्यानंतर २०१२ मध्ये चंद्रपूरला ८५ वे साहित्य संमेलन घेण्यात आले. मात्र, त्यानंतर गेल्या चार वषार्ंत विदर्भातून एकही प्रस्ताव महामंडळाकडे आलेला नाही.
अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय नागपूरला आले असले तरी विदर्भातून तुर्तात एकही प्रस्ताव नाही. २००७ नंतर गेल्या ९ वर्षांत नागपूरला संमेलन झालेले नाही. ते आयोजित करण्याची ज्या कुठल्या संस्थेची इच्छा आणि तशी क्षमता असेल त्यांनी साहित्य महामंडळाकडे प्रस्ताव द्यावा. त्यांच्या प्रस्तावावर १७ जुलैला होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीत विचार केला जाईल.
– डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष