पेंच व्याघ्र प्रकल्पालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर पुन्हा एका वन्यप्राण्याचा बळी गेला आहे. या महामार्गावर आतापर्यंत वाघ आणि बिबटय़ासह अनेक वन्यप्राणी वाहनाच्या धडकेने मृत्युमुखी पडले आहेत. अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्पालगतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीदरम्यान वन्यप्राण्यांसाठी प्रभावी उपाययोजना केली जात नाही. राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनांचा वेग विशेषत: रात्रीच्या सुमारास प्रचंड असतो. वन्यप्राण्यांच्या भ्रमंतीची वेळसुद्धा रात्रीचीच असल्याने हा महामार्ग ओलांडताना कित्येकदा ते वाहनाखाली येतात. भुयारी मार्गाअभावी जंगलाची संलग्नता धोक्यात आली आहे. नागपूरलगतचे मनसर ते मध्यप्रदेशातील खवासादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या चौपदरीकरणाचा मुद्दा याच कारणामुळे रखडला. विकास की वन्यप्राणी आणि पर्यावरण सुरक्षा अशा कात्रीत या महामार्गाचे चौपदरीकरण अडकल्यामुळे सरकार आणि स्वयंसेवी समोरासमोर उभे ठाकले.
तीन दिवसांपूर्वी या महामार्गावर काळविटाचा बळी गेला. या मार्गावरून जाणाऱ्या एका वन्यजीवप्रेमीच्या निदर्शनास हा मृत्यू आल्याने त्याने वनखात्याला याची सूचना दिली. मात्र, प्रत्येकवेळी त्या ठिकाणाहून वन्यजीवप्रेमीच जाईल, असे नाही आणि प्रत्येकवेळी वन्यप्राण्याच्या मृत्यूची सूचना वनखात्याला दिली जाईल, असेही नाही. अंधार पडला की वाहनांचा वेगही वाढतो आणि वन्यप्राण्यांच्या भ्रमणाचाही वेग वाढतो. या दोन्हीची परिणती अपघातात होते. या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या मुद्दय़ाला दशक उलटून गेले, पण अजूनही गुंता सुटला नाही. रस्ता ओलांडताना काळजी घेण्याची अपेक्षा वन्यप्राण्यांकडून करता येणे शक्य नाही, पण वाहनधारकांना याची पूर्णपणे जाणीव आहे आणि अशावेळी त्यांनी वाहनांची गती कमी ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, विकास की वन्यप्राणी सुरक्षा आणि पर्यावरण अशा कात्रीत बळी वन्यप्राण्यांचेच जात आहेत.