उपराजधानीतील दोन्ही प्रकल्प वन्यजीवप्रेमी पर्यटकांसाठी महत्त्वाचे असताना पूर्णत्वास येऊन अनेक वर्ष लोटलेल्या एका प्रकल्पाच्या भवितव्यावर सध्या प्रश्नचिन्ह उभे आहे, तर दुसरा प्रकल्प पूर्णत्वास आलेला नसताना त्याचेही भवितव्य अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे इतर राज्यांमध्ये राबवण्यात येणारी वन्यप्राणी दत्तक योजना उपराजधानीत सुरू करूनही या योजनेचा फज्जा उडाला आहे.
वन्यप्राणी दत्तक योजना केंद्राने सुरू केल्यानंतर आसाम व झारखंडमधील प्राणिसंग्रहालयाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. या राज्यातल्या प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांचे पालकत्व स्वीकारण्यासाठी अनेक ‘सेलिब्रिटी’ समोर आले. मात्र, महाराष्ट्रातल्या प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांच्या नशिबी असे भाग्य आले नाही. कधीकाळी मध्य भारतातील वन्यजीवप्रेमी पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेल्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयातही तीन वर्षांपूर्वी या योजनेला सुरुवात झाली. एका अनिवासी भारतीयाने या प्राणिसंग्रहालयातील वाघाचे पालकत्व स्वीकारले. त्यानंतर अभिनेता टायगर श्राफने ‘ली’ वाघिणीचे पालकत्व दोन वर्षांपूर्वी स्वीकारले. पालकत्वाची मुदत संपल्यानंतर या दोघांपैकी कुणीही महाराजबाग प्राणिसंग्रहालयाकडे ढुंकून पाहिले नाही किंवा प्राणिसंग्रहालय प्रशासनाशी संपर्क साधला नाही. मोर, नीलगायीसारख्या प्राणी आणि पक्ष्यांचे पालकत्व शाळांनी किंवा संस्थांनी स्वीकारले, पण त्यानंतर मुदत वाढवण्यात कुणीही रस दाखवला नाही. इतर राज्यात चित्रपट, क्रिकेट क्षेत्रातील ‘सेलिब्रिटी’ वन्यप्राणी दत्तक घेण्यासाठी समोर येत असताना आणि मुदत वाढवण्यास इच्छुक असताना महाराष्ट्रात ही योजना अल्पशा प्रतिसादावर तग धरून आहे. या योजनेवरून आता महाराजबाग आणि गोरेवाडा प्राणिसंग्रहालय अमोरासमोर उभे ठाकले आहे.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्रकल्पाची सुरुवात झाल्यानंतर महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या चारही बाजूने महाराजबाग प्राणिसंग्रहालय कात्रीत सापडले आहे. या प्राणिसंग्रहालयातील प्राणी गोरेवाडय़ात हलवून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावर असलेले हे प्राणिसंग्रहालय बंद करण्याच्या तयारीत सरकार आहे, तर दुसरीकडे महापालिकेने सुरू केलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणात हे प्राणिसंग्रहालय सापडले असून त्याचे चार तुकडय़ात विभाजन झाले आहे. दुसरीकडे आता गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील बचाव केंद्र सुरू झाल्यानंतर गोरेवाडा प्रशासनानेही वन्यप्राणी दत्तक देण्यासाठी कंबर कसली आहे. सध्याच्या स्थितीत गोरेवाडा बचाव केंद्रात नऊ बिबटय़ांसह माकड, हरीण व इतर प्राणी आणि पक्षी आहेत. योजनेला बळ मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील वाघासाठी मागणी केली आहे. मात्र, अजूनपर्यंत या वाघाचे स्थानांतरण होऊ शकलेले नाही आणि एकही प्राणी, पक्षी दत्तक जाऊ शकला नाही.
महाराजबाग प्राणिसंग्रहालय प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर या प्राणिसंग्रहालयाचे भवितव्य अधांतरी असल्याने त्याचा परिणाम दत्तक योजनेवर झाल्याचे त्यांनीही मान्य केले. ‘सेलिब्रिटी’ न वळण्यामागील कारणांचा उलगडा त्यांना करता आला नाही. शहरातील विविध क्षेत्रातील नामवंतही या योजनेकडे वळायला तयार नाहीत कारण त्यांना समोर यायचे नाही. काहींनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर काही प्राणी आणि पक्ष्याचे पालकत्व स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील वाघ गोरेवाडय़ात आल्यास गोरेवाडय़ाच्या दत्तक योजनेला बळ मिळेल, असे गोरेवाडा प्रशासनाने सांगितले.