दोन्ही काँग्रेसमध्ये सभागृहातील रणनीतीबाबत समन्वयाचा अभाव

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांना सरकारची कोंडी करण्याची संधी आहे. मात्र सभागृहात सरकारशी दोन हात करताना त्यांची एकजूट होण्याची शक्यता कमीच आहे.
काँग्रेसने अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मोर्चा आयोजित करून सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीने मात्र या संदर्भात ठोस भूमिका घेतलेली नाही.
विधान परिषदेच्या आठ जागांसाठीच्या निवडणुका एकत्र लढण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत. विधान परिषदेच्या जागा वाटपावर एकमत झाल्यास हे दोन्ही पक्ष काही मुद्दय़ांवर एकत्रितपणे सरकारविरोधी भूमिका घेण्यात शक्यता अधिक आहे. एकमत झाले नाही, तर स्वतंत्रपणे त्यांची रणनीती असेल आणि असे झाले तर याचा फायदा अंतर्गत धुसफुसीमुळे त्रस्त असलेल्या सत्ताधाऱ्यांना मिळणार आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे गुरुवारी नागपुरात होते. त्यांनी काँग्रेसचा मोर्चा आणि विधान परिषदेतील जागा वाटपाबाबत पक्षाची भूमिका मांडली. ही भूमिकाच पुढच्या काळात हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर प्रश्नचिन्हे निर्माण करणारी आहे. सध्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी केवळ विधान परिषद निवडणुकीपुरती असेल आणि अधिवेशनात मात्र बिघाडी राहील, असे चित्र आहे. काँग्रेसने अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मोर्चा काढण्याचा निर्णय घेऊन विरोधी पक्ष म्हणून बाजी मारली आहे. राष्ट्रवादीकडे सरकारवर हल्लाबोल करण्याची रणनीती दिसून येत नाही. वर्षभरात राष्ट्रवादीने जनतेच्या प्रश्नांवर जेल भरो आणि थाळीनाद आंदोलन केले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. या पत्राला दोन-तीन दिवसांत उत्तर येणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर पुढची रणनीती आखण्यात येईल, असे सांगून तटकरे यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन
सरकारला शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे भाव, महागाई आणि करवाढीचा बोजा, अशा सर्वच पातळ्यांवर अपयश आल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस सरकारला नामोहरम करण्यासाठी काँग्रेसने मोर्चा आयोजित केला आहे. मोर्चासाठी विदर्भातील ११ जिल्ह्य़ांमधून १ लाख लोक मोर्चात सहभागी होतील, असा दावा केला जात आहे. जिल्हा व शहराध्यक्ष आणि स्थानिक नेत्यांवर मोर्चाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रत्येक जिल्ह्य़ासाठी निरीक्षक नेमले आहेत. एकीकडे मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेसने शक्तिप्रदर्शन आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचे प्रयत्न चालवले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीने विरोधक म्हणून अद्याप रणनीतीच आखली नसल्याचे दिसून येते.