अखेर बाई अडकल्या. तीनदा वाया गेलेला सापळा चौथ्यांदा यशस्वी झाला आणि केवळ १५ हजारांसाठी बाई प्रतिष्ठा गमावून बसल्या. बाई तशा उच्चशिक्षित, सरकारी नोकरीत उच्चपदावर, एका मोठय़ा रुग्णालयाच्या प्रमुख, वर्षांकाठी नुसता पगारच २५ लाख रुपये. तरीही पैशाचा मोह त्यांना आवरता आला नाही. वैद्यकीय शिक्षणाची काठीण्य पातळी जरा वरच्या दर्जाची असते. सुमार बुद्धिमत्ता असलेले लोक हे शिक्षण घेऊ शकत नाहीत. तेजस्वी बुद्धी व अभ्यासातील सातत्य या बळावर हे शिक्षण घेणाऱ्यांना समाजात हुशार म्हणून ओळखले जाते. त्यामुळे बाईची गणना सुद्धा याच वर्गात होत होती. मात्र, हुशार व बुद्धिमान माणसे पैसे खात नाहीत, हा समज भाबडा आहे हे या बाईने पुन्हा एकदा सिद्ध केले. अलीकडच्या काळात अशा घटना वाढल्या आहेत. हुशार व बुद्धिमान माणसेच जास्त पैसे खायला लागली आहेत. बाईंची लाचखोरी सुद्धा त्यातलीच. आजकाल अशी लाचखोरीची अनेक प्रकरणे रोज उघडकीस येत असतात. त्यामुळे या प्रकरणात वेगळे ते काय, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. त्याचे उत्तर काही दिवसापूर्वीच्या घटनांमध्ये दडलेले आहे. अगदी ही घटना घडेपर्यंत या बाईंना सारे शहर, वरिष्ठ प्रशासकीय वर्तुळ त्यांनी एका प्रकरणात दाखवलेल्या बाणेदारपणामुळे ओळखत होते. सत्ताधारी कुठलेही असोत, त्यांच्याविरुद्ध लढणे सोपे नसते. सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला बांधलेल्या प्रशासनात राहून विरोधात लढणे तर आणखी कठीण. मात्र, या बाईंनी हा लढण्याचा मार्ग स्वीकारला. कार्यालयात येऊन धुडगूस घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या टोळीविरुद्ध त्यांनी थेट पोलिसात तक्रार केली. या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ही तक्रार देताना बाईंनी आणखी धूर्तपणा दाखवला. स्वत: मागास असल्याचा दाखला देत त्यांनी तक्रार केली, त्यामुळे प्रकरण आणखीच गंभीर झाले. सध्या संपूर्ण राज्यात अ‍ॅट्रॉसिटीवरून राजकीय वातावरण तापलेले असताना बाईंच्या या बाणेदारपणामुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले. हिवाळी अधिवेशनात प्रकरण गाजले. थेट राज्याच्या प्रमुखाला उत्तर देऊन विरोधकांना शांत करावे लागले. गुंडगिरी कुणाचाही असो, ती अजिबात खपवून घेणार नाही अशी वृत्ती प्रशासनात हवीच, त्यातल्या त्यात सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी तर सहनच करणार नाही असाही प्रशासनाचा पवित्रा असायला हवा. नेमका तोच कुठे दिसत नसताना बाईंनी घेतलेली भूमिका सर्वत्र चर्चेचा विषय झाली. राज्यप्रमुखाच्या गावात राहून अप्रत्यक्षपणे त्यांच्याशीच दोन हात करण्याची तयारी बाईंनी दाखवल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक झाले. हे कौतुकाचे वारे अजून ओसरायला सुद्धा सुरुवात झाली नसतानाच बाई लाच घेताना सापडल्याची बातमी आली आणि सत्ताधाऱ्यांच्या वर्तुळात आनंदाला उधाण आले. आजवर ताठ मानेने जगणाऱ्या बाईवर मान खाली घालण्याची पाळी आली, तर सत्ता असून सुद्धा पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागतात म्हणून वैतागलेल्या टोळभैरवांना या घटनेने मोठाच दिलासा मिळाला. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाटचाल करणे हे मोठे कठीण काम असते. त्यासाठी हिंमत लागतेच पण पदोपदी परीक्षा देण्याची तयारी सुद्धा लागते. हे सर्व करायचे असेल तर अंगी उच्च दर्जाचे नैतिक अधिष्ठान लागते. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही याचे भान ठेवावे लागते. येथे तर बाई केवळ १५ हजारासाठी सारी नैतिकता गमावून बसल्या. पैशाची लालसा एकदा सुटली की कुठे थांबावे हेच अनेकांना कळत नाही. या बाईंचेही कदाचित तसेच झालेले दिसते. सारे कुटुंब उच्चशिक्षित, भरपूर पगार, मुले चांगल्या वळणावर लागलेली, तरीही पैसे खाण्याची कुबुद्धी कशी काय होत असेल असा प्रश्न अनेक विचारी मनांना आता पडला आहे. माणसाला अनेक मोहांवर नियंत्रण मिळवता येते, पण पैशाचा मोह मरेपर्यंत सुटत नाही असे जुनेजाणते लोक सांगत असतात. कदाचित ते खरे असावे असा तर्क काढायला आता हरकत नाही. आता या ‘रंगेहाथ’ प्रकरणानंतर बाई लगेच आपली बाजू मांडतील. मला फसवले म्हणतील, हे करताना त्यांना मागास असल्याचा साक्षात्कारही होईल, या कथित अन्यायाविरुद्ध लढा देईल असेही त्या म्हणतील, माझ्याविरुद्ध रचण्यात आलेला हा कट आहे असा युक्तिवाद सुद्धा त्या करतील. मात्र, या कांगाव्याने त्यांची गेलेली प्रतिष्ठा अजिबात परत मिळणार नाही. बाणेदार अधिकारी या प्रतिमेला गेलेला तडा कायम राहील. काही दिवसानंतर अशी प्रकरणे विस्मृतीत जातात हे खरे असले तरी जेव्हा केव्हा या बाईची आठवण निघेल तेव्हा त्यांनी आधी दाखवलेल्या धाडसासोबतच नंतर खाल्लेल्या लाचेचाही उल्लेख होत राहील. सत्ताधारी काहीही करू शकतात. विरोधात जाणाऱ्या अधिकाऱ्याला सापळ्यात अडकवू शकतात. वेगवेगळी आयुधे वापरून त्यांना नामोहरम करू शकतात. याही प्रकरणात ते झाले असावे या शक्यतेची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, रंगेहाथ सापडणे आणि आरोप होणे यात भरपूर अंतर आहे हे चर्चा करणाऱ्यांनी ध्यानात ठेवणे सुद्धा गरजेचे आहे. प्रवाहाविरुद्ध पोहताना झालेली थोडीशी चूक सुद्धा अंगावर येऊ शकते या साध्या गोष्टीचा विसर बाईंना पडला हेच यातले वास्तव आहे. सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढण्याचा बाणेदारपणा दाखवला म्हणजे आपण कुणीतरी विशेष व्यक्ती आहोत, आता आपले कुणीच काही बिघडवू शकत नाही अशा भ्रमात बाई वावरल्या आणि त्यातूनच यात अडकल्या. असे भ्रम माणसाला वास्तवापासून दूर नेत असतात हे साधे तत्त्व या शिक्षित बाईला कळू शकले नाही. सध्या सर्वत्र ती काय करतेय या शीर्षकाचा बोलबाला आहे. त्या अनुषंगाने स्त्रियांच्या जीवनाचे अनेक पदर उलगडून दाखवण्याची अहमहमिका समाजमाध्यमात लागली आहे. त्यात आता ती सध्या लाचही खाते हे वाक्य जोडण्याची वेळ बाईंच्या या प्रतापामुळे आली आहे.

devendra.gawande@expressindia.com