महिन्यातून आठ तास श्रमदानाची शिक्षा

युग मुकेश चांडक हत्याकांडातील अल्पवयीन आरोपीला बुधवारी बाल न्यायमंडळाने आगळीवेगळी शिक्षा ठोठावली. त्याच्यावर दोन वष्रे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि जिल्हा बार परीविक्षाधीन अधिकारी हे देखरेख ठेवतील. या काळात त्याला महिन्यातून दोन दिवस प्रत्येकी चार तास एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून श्रमदान करावे लागेल. याशिवाय त्याला दारू किंवा अंमली पदार्थाच्या सेवनास बंदी असून न्यायमंडळाच्या पूर्वपरवानगीशिवाय नागपूर जिल्हा सोडता येणार नाही, असे उच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे.

लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील डॉ. मुकेश चांडक यांचा मुलगा युग याचे १ सप्टेंबर २०१४ ला खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. खंडणी देण्यास उशीर झाल्याने आणि पोलिसांना माहिती दिल्याने अपहरणकर्त्यांनी त्याचा खून केला. या प्रकरणात पोलिसांनी राजेश धनलाल दवारे आणि अरविंद अभिलाष सिंग यांना अटक केली होती. त्यांच्यासोबत एक अल्पवयीन आरोपीही होता.  राजेश व अरविंदविरुद्ध सत्र न्यायालयात खटला चालविण्यात आला. सत्र न्यायालयाने दोघांनाही दोषी धरून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयानेही फाशी कायम ठेवली. मात्र, अल्पवयीन आरोपीवर बाल न्यायमंडळासमोर खटला चालविण्यात आला. अल्पवयीन आरोपीविरुद्ध कट रचणे आणि खंडणी मागण्याचे गुन्हे सिद्ध झाले. त्यानंतर आज बुधवारी बाल न्यायमंडळाचे न्या. एन.एन. बेदरकर यांनी त्याला शिक्षा ठोठावली.

घटनाक्रम

१ सप्टेंबर २०१४

  • ४.३० वाजता युगचे अपहरण
  • ५ वाजता पोलिसांत तक्रार
  • ५.३० वाजता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना दूरध्वनी
  • ६.१५ वाजता राजेशला पोलिसांचा दूरध्वनी
  • ६ ते ६.३० दरम्यान युगची हत्या
  • ७.३० वाजता राजेश रुग्णालयात हजर
  • रात्री १० वाजताच्या सुमारास १० कोटी खंडणीचा दूरध्वनी

२ सप्टेंबर २०१४

  • सकाळी ११ वाजता पुन्हा खंडणीसाठी दूरध्वनी
  • सायंताळी ५ वाजता पोलिसांनी राजेशला ताब्यात घेतले
  • सायंकाळी ६ वाजता राजेशकडून युगचे अपहरण आणि खुनाची कबुली
  • सायंकाळी ७ वाजता राजेशने युगचा मृतदेह दाखविला

३ सप्टेंबर २०१४

  • दुपारी २ वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार
  • २८ नोव्हेंबर २०१४ न्यायालयात आरोपपत्र दाखल
  • ३० जानेवारी २०१६ आरोपींविरुद्ध गुन्हे सिद्ध
  • ४ फेब्रुवारी २०१६ सत्र न्यायालयाचा निकाल
  • २० जुलै २०१७ बाल न्यायमंडळाकडून अल्पवयीन आरोपी दोषी
  • २६ जुलै २०१७ न्यायमंडळाकडून अल्पवयीन आरोपीला शिक्षा.