नागपूर मेट्रो रेल्वेची शहरातील सर्व स्थानके ही शहराच्या सौंदर्यात भर घालणारी ठरणार आहेत. त्यादष्टीने व्यवस्थापनाने नियोजनही केले आहे. रिझव्‍‌र्ह बँक चौकातील प्रसिद्ध झिरो माईल्सचे देश पातळीवरील महत्त्व लक्षात घेऊन व त्याचा ऐतिहासिक दर्जा कायम ठेवूनच तेथे भव्य स्थानक उभारण्याचा विचार आहे.

मेट्रो रेल्वे स्थानकांचा आराखडा तयार करण्याचे काम एल अ‍ॅण्ड टी या कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. वर्धा मार्गावरील ९ स्थानकांचे आराखडे तयारही करण्यात आले असून त्यांची संकल्पचित्रेही जारी करण्यात आली आहेत. मुंबईतील प्रसिद्ध व ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकांच्या आठवणी ताज्या व्हाव्या अशी ही स्थानके असणार आहेत. त्याच बरोबर काही स्थानके ऐतिहासिक स्थळांची आठवण करून देणारी आहेत. देशाचे मध्यवर्ती ठिकाणची ओळख असलेल्या शहरातील झिरो माईल्स स्तंभाजवळही एक स्थानक प्रस्तावित आहे. ते भव्य आणि तितेकच आकर्षक करण्याचे प्रयत्न आहेत. झिरो माईल्सचा ऐतिहासिक वारसा कायम ठेवून इतरही सोयी सुविधा तेथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शासकीय मुद्रणालयाची इमारत असलेली जागाही ताब्यात घेण्याचा विचार आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर शासकीय मुद्रणालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करून इतर जागा या स्थानकासाठी वापरण्याचा विचार आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास आणि हेरिटेज समिती यांच्या संयुक्त बैठकाही यापूर्वी पार पडल्या आहेत. या परिसरात गोवारी स्मारक, मॉरिस कॉलेज, सीताबर्डी किल्ला, शहीद स्मारक आहे. हा परिसर पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करण्याचेही प्रयत्न आहेत.  याच परिसरात प्रवाशांसाठी तसेच नागरिकांना फिरण्यासाठी ‘हेरिटेज स्ट्रीट’ तयार केला जाणार असून त्यासाठी आकर्षक अशा दगडांचा वापर केला जाणार आहे. त्याच प्रमाणे आकर्षक अशी कारंजी, नागरिकांना बसण्यासाठी आरामदायी खुच्र्या तसेच विविध प्रकारच्या वनस्पतीचीही लागवड करण्यात येणार आहे.

आठ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा हा प्रकल्प पुढील दोन वषार्ंत पूर्ण करण्याचे व्यवस्थापनाचे लक्ष्य आहे. सरकारी आणि विदेशी बँकेकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्यासह इतर पर्यायी उत्पन्नाच्या स्रोतातूनही निधी उभारणी केली जाणार आहे. त्याच प्रमाणे खर्च कपातीवरही भर देण्यात येत आहे. ऊर्जाबचतीसाठी आवश्यक त्या ठिकाणी सौर उर्जेचा वापर या प्रकल्पासाठी केला जात आहे. वर्धा मार्गावर मेट्रो मार्गाचे काम सुरू असून आतापर्यंत आठ खांब उभे झाले आहेत. अशा प्रकारच्या प्रकल्पाच्या कामाचा अनुभव असणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीला प्रमुख सल्लागार नियुक्त करण्यात आले आहे.