माहितीच्या अधिकारातून माहिती प्राप्त

महापालिकेच्या सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या सभांवेळी चहापान व अल्पोपाहारासाठी चार वर्षांत थोडा थोडका नव्हे, तर तब्बल ७६ लाख ३५ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती पुढे आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती प्राप्त केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या चार वर्षांतील संपूर्ण माहिती पालिकेने दिलेली नाही.

गत चार वर्षांत महापालिकेच्या एकूण ९९ सर्वसाधारण सभा झाल्या. या सभांसाठी चहापान व अल्पोपाहारावर ५० लाख ८२ हजार ६५४ रुपये खर्च झाला आहे. सर्वसाधारण सभेसाठी नगरसेवकांना भत्ताही दिला जातो. त्या भत्त्याचा खर्च १२ लाख ८२ हजार १२३ रुपये असल्याची माहिती पालिकेने दिली. चार वर्षांत स्थायी समितीच्या १८६ सभा झाल्या. या सभांसाठी चहापान व अल्पोपाहारावर १२ लाख ७० हजार ६४३ रुपये खर्च झाले. हा सर्व एकूण खर्च ७६ लाख ३५ हजार ४२० रुपये इतका असल्याचे करंजकर यांनी सांगितले. माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीत २४ ऑगस्ट २०१३ पासून पुढील खर्चाची आकडेवारी दिलेली नाही. तसेच स्थायी समितीचा अल्पोपाहार खर्च १९ जुलै २०१३ पासूनची आकडेवारी दिलेली नाही. स्थायी समिती सभाभत्त्याची माहिती दिलेली नसल्याचे करंजकर यांनी सांगितले.

प्राप्त झालेल्या माहितीवर नजर टाकल्यास वर्षांगणिक हा खर्च नियंत्रणात येण्याऐवजी त्यात वाढच होत असल्याचे दिसते. २०११-१२ मधील सभेत किमान ६८ हजार तर कमाल एक लाख १५ हजार रुपये खर्च आल्याचे दिसते. या वर्षांचा एकूण खर्च १७ लाख ४० हजार इतका आहे. २०१२-१३ या वर्षांत बहुतांश सभांचा खर्च ९२ हजारांहून अधिक आहे. या वर्षांत चहापान व अल्पोपाहारावर ५३ लाखांहून अधिकची रक्कम खर्ची पडली. त्यापुढील वर्षांची माहिती देणे पालिकेने टाळले आहे. पालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीविषयी सर्वसाधारण सभेत अनेकदा चर्चा होत असते. विविध खर्चावर नियंत्रण आणण्याचा विचार केला जातो. तथापि, त्यात अनेक बाबी दुर्लक्षित राहतात. काटकसरीचे धोरण अनेक बाबींमध्ये सहजपणे लागू करता येईल, असे करदात्या नागरिकांचे म्हणणे आहे.