महाऑनलाइनतर्फे पुन्हा प्रक्रिया सुरू होणार

नागरिकांना सर्वमान्य ओळख मिळवून देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘युनिक आयडेंटिफिकेशन नंबर’ अर्थात आधार कार्ड काढणे सर्वच शाळांमध्ये सध्या विद्यार्थ्यांना सक्ती केली जात आहे. मात्र, केंद्र अस्तित्वात नसल्याने पालकांना त्यांचे आधार कुठे काढावे, हा प्रश्न भेडसावत आहे. आधार कार्ड नोंदणीचे काम ज्या संस्थेला दिले गेले, तिचा करार संपुष्टात आल्यामुळे नोंदणीची प्रक्रिया बंद पडली आहे. या एकंदर स्थितीत ‘महाऑनलाइन’कडे सुपूर्द झालेली नोंदणीची प्रक्रिया लवकरच नव्याने कार्यान्वित होत असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

घरगुती सिलिंडरचे अनुदान, बँक खाते, शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता आधार कार्ड बंधनकारक असल्याचे जाहीर झाल्यावर काही वर्षांपूर्वी कार्ड काढण्यासाठी सर्वत्र रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. खासगी एजन्सीला हे काम सोपविले गेले होते. त्या काळात आधार कार्डच्या नोंदणीचे केंद्र सापडणे सर्वसामान्यांसाठी एक अशक्यप्राय बाब ठरली. अखेरच्या टप्प्यात नोंदणीला घरघर लागली. दरम्यानच्या काळात पाच वर्षांपुढील प्रत्येक मुलाचे आधार कार्ड काढण्याची सक्ती करण्यात आली. शाळांनाही तशा सूचना दिल्या गेल्या. शाळांमध्ये ही नोंदणी केली जाईल असेही सांगितले. परंतु, तसे घडले नसल्याचा बहुतांश पालकांचा अनुभव आहे. आजही अनेक शाळांमधील शेकडो मुले आधारपासून वंचित आहे.

जिल्ह्यत हजारो प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. तेथील लाखो विद्यार्थ्यांची आधार कार्ड काढण्यासाठी सक्षम व्यवस्था उपलब्धता न झाल्यामुळे शाळांनी बाहेरील खासगी केंद्रातून आधार कार्ड काढावे, असा पवित्रा स्वीकारल्याने विद्यार्थी व पालक कोंडीत सापडले.

शासनाने नियुक्त केलेली एजन्सी आणि केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान विभागाने खासगी एजन्सीला दिलेली केंद्र या ठिकाणी आधार कार्ड नोंदणीचे काम सुरू होते. खासगी केंद्रांची संख्या मर्यादित असल्याने आणि त्याबद्दल फारशी माहिती नसल्याने नागरिकांसह पालकांची अडचण झाली. शहरात महापालिकेमार्फत नोंदणी केंद्र सुरू होते. आता खुद्द पालिकेला त्याबाबत माहिती नाही. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड कसे व कुठे काढावे, असा प्रश्न मागील काही महिन्यांपासून अनेकांना भेडसावत आहे. आधार नोंदणी करणाऱ्या एजन्सीशी असणारा करार जूनमध्ये संपुष्टात आला.

बँकेत खाते उघडताना, पारपत्र मिळविताना, वाहनचालक परवाना मिळविताना अथवा तत्सम कामे करताना प्रत्येक वेळी स्वत:ची ओळख पटविणारी कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी आधार क्रमांक सर्वमान्य ओळख बनविण्याच्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आधार क्रमांकाद्वारे स्वत:च्या ओळखीचा पुरावा उपलब्ध झाल्यामुळे समाजातील गरीब व दुर्बल गटातील नागरिकांना बँकेमार्फत व्यवहार पूर्ण करण्याची तसेच सरकार व खासगी क्षेत्रामार्फत उपलब्ध विविध सेवा प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली.

महाविद्यालयीन विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी आधीच आधार नोंदणी केली आहे. त्यातील काही घटक आधार कार्डच्या नोंदणीपासून दूर आहेत. आधार कार्ड नोंदणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांंची संख्या लाखोंच्या घरात आहे. नोंदणीसाठी नसलेली सुविधा हे त्याचे मुख्य कारण. शाळेतच शिबिरांचे आयोजन करून विद्यार्थ्यांची नोंदणी केल्यास खासगी एजन्सीमध्ये पैसे देण्याची वेळ येणार नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

आधार नोंदणीची सद्यस्थिती

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६१ लाख ६९ हजार ५६३ जणांची आधार नोंदणी झाली आहे. हे प्रमाण ९५.५० टक्के असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. म्हणजे साडे चार टक्के नागरिकांची आधार नोंदणी अद्याप बाकी आहे. यामुळे शहर व ग्रामीण भागात कायमस्वरूपी केंद्र सुरू ठेवण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. तालुकानिहाय विचार केल्यास सुरगाणा व नाशिक तालुक्यात सर्वाधिक तर कळवण व पेठ तालुक्यात सर्वात कमी नोंदणी झाली आहे.

नवीन आधार कार्डसाठी शुल्क नाही

केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान विभागाने आधार नोंदणीचे काम काही खासगी एजन्सीला दिले आहे. या केंद्रांवर आधार नोंदणीसाठी ५० ते १०० रुपये आकारले जातात, अशी नागरिकांची तक्रार आहे. तथापि, नवीन नोंदणीसाठी पैशांची गरज नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आधार कार्डमध्ये काही दुरुस्ती वा पत्ता बदल करावयाचा असल्यास विहित शुल्क द्यावे लागते. अनेक ठिकाणी सर्रास पैसे घेतले जात असून प्रशासनाने संबंधित एजन्सीवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

नोंदणीचे काम लवकरच

आधार नोंदणीच्या कामाची जबाबदारी आता महाऑनलाइनकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत नव्याने एजन्सी नियुक्त करून आधार नोंदणीचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. या बाबतची माहिती उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली. प्रशासनाकडील १४० आधार नोंदणीची उपकरणे महाऑनलाइनला देण्यात आली आहे. ही उपकरणे संबधितांकडून नव्याने कार्यान्वित केली जात आहे. आधीच्या एजन्सीद्वारे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये आधार नोंदणीसाठी शिबिरे घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवीन एजन्सीकडे हे काम दिले गेले असून लवकरच आधार नोंदणी केंद्र आणि शाळांमध्ये नोंदणीचे काम सुरू होईल, असे मंगरुळे यांनी सांगितले.