नाशिक जिल्ह्यात सलग दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणातून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. रात्रभर सुरू असलेला पाऊस सोमवारी सकाळपासून काहीसा कमी झाला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात २८ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक १०७ मिमी पावसाची नोंद झाली. आहे. संततधारेमुळे गंगापूर धरण ८० टक्के भरले असून धरणातून ७ हजार ७८२ क्यूसेक आणि होळकर पुलाखालून ९ हजार ४६९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात आला. नदीला आलेल्या पुरामुळे गोदाघाटाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. नागरिकांना याठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला असून गोदाकाठ परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सकाळी ९ वाजता नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून ६१ हजार क्यूसेक, दारणा धरणातून ११ हजार ५०० क्यूसेक, गंगापूर धरणातून ७ हजार ७८२ क्यूसेक, होळकर पुलाखालून ९ हजार ४६९ क्यूसेक, कादवा धरणातून २ हजार ६५८ क्यूसेक, भावली धरणातून १ हजार ६६३ क्यूसेक, पालखेड धरणातून ७८२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर धरणातूनपुढे जायकवाडी धरणाकडे जाणाऱ्या गोदावरी नदीतून ६१ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीने विशाल रूप धारण केले आहे. नदीकाठच्या १३८ गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आला आहे. नाशिकमधील गोदावरी नदीपात्रातील पंचवटी परिसरातील रामकुंड परिसरातील प्राचीन नारोशंकर मंदिर, नीलकंठेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर आणि इतर मंदिराच्या कळसापर्यंत पुराचे पाणी पोहचले आहे. पुरात राम सेतूसह सर्व छोटे पूल पाण्याखाली बुडाले असून या पुलांवरून पाणी ओसंडून वाहत आहे. पुराचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या दुतोंडया मारुतीच्या मूर्तीवरून पाणी वाहू लागले आहे. गोदावरी पात्राच्या परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंचवटी परिसरातील गोदाघाटाकडे जाणारे गणेशवाडी, मालेगाव स्टँड, कपालेश्वर, रोकडोबा,पंचवटी वाचनालय, एकमुखी दत्त मंदिर, अमरधाम रोड या रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोदाघाटाकडे जाणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.