शहरातील प्रमुख रस्त्यांवर धूम पद्धतीने दुचाकी वाहनांची रपेट मारणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर कारवाईचे सत्र सुरूच असून बुधवारी पाथर्डी फाटा आणि बिटको चौक परिसरात २९८ वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. कॉलेज रोडवर भरधाव जाणाऱ्या दुचाकीच्या धडकेत महाविद्यालयीन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. महाविद्यालय परिसरातील रस्ते अपघातप्रवण क्षेत्र बनले असून पोलीस यंत्रणा बेशिस्त वाहनधारकांकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार करत प्राध्यापक व कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. या घटनेची दखल घेऊन पोलिसांनी ठिकठिकाणी बेशिस्त युवकांच्या वाहनांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

शहरातील ज्या ज्या भागात महाविद्यालय परिसर आहे, त्या ठिकाणी काही युवक भरधाव वाहने दामटवत कसरती करत असतात. या घडामोडी एखाद्याच्या जिवावर बेतत असल्याने आणि या मुद्दय़ावर प्राध्यापक रस्त्यावर उतरल्याने पोलिसांनी बेशिस्त वाहनांविरुद्ध कारवाई सुरू केली. त्या अंतर्गत सलग दुसऱ्या दिवशी नाशिक रोडचा बिटको चौक आणि मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पाथर्डी फाटा येथे सकाळपासून वाहन तपासणी सुरू करण्यात आली.

रस्त्यात लोखंडी जाळ्या लावून दुचाकी वाहनधारकांना रोखण्यात आले.

या तपासणीमुळे वाहनधारक विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. वाहन चालविण्याचा परवाना नसणे, कागदपत्रे जवळ न बाळगणे, क्षमतेहून अधिक वाहनांची वाहतूक अशा विविध कारणांवरून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पाथर्डी फाटा येथे १६३ तर बिटको चौक परिसरात १४५ वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली.

मारहाण प्रकरणात ११ विद्यार्थ्यांना अटक

नाशिकरोड परिसरातील आरंभ, बिटको व मेहता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात उपनगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ११ विद्यार्थ्यांना अटकही करण्यात आली. या पाश्र्वभूमीवर, पोलिसांनी आरंभ महाविद्यालयातील प्राचार्याची भेट घेऊन गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्याची सूचना केली. महाविद्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची पडताळणी करून त्यात बदल करावे, असेही सूचित करण्यात आले आहे. ज्या ११ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली, त्यांच्या पालकांना महाविद्यालयात बोलावण्यात आले. एका विद्यार्थ्यांकडे तिक्ष्ण हत्यार आढळून आले.