नोटा बंदीच्या प्रारंभीच्या काळात सोने खरेदीला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आणि या खरेदीवर प्राप्तीकर विभागाने वक्रदृष्टी फिरवल्यानंतर चार महिने मंदीच्या सावटाखाली सापडलेल्या सराफ बाजाराला अक्षय्यतृतीयेच्या दिवशी खरेदीची झळाली लाभल्याचे पहावयास मिळाले. सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सोन्याचे दर पंधरवडय़ात ७०० रुपये तर चांदीचे दीड हजार रुपयांनी कमी झाल्यामुळे ग्राहकांच्या उत्साहात अधिकच भर पडली. खरेदीतील उत्साह पाहून मंदीचे सावट दूर सारले गेल्याची प्रतिक्रिया सराफ व्यावसायिकांमधून उमटत आहे.

अक्षय्य तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. या दिवशी ग्राहकांकडून प्रामुख्याने चोख स्वरूपात सोने-चांदे खरेदीला प्राधान्य दिले जाते. वर्षभराच्या काळात या दिवशी सोन्या-चांदीची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जात असल्याने त्याचे दर किमान या दिवशी तरी चढेच राहतात, असा आजवरचा अनुभव. या वर्षी मात्र त्यास छेद मिळाल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे होते. पंधरवडय़ात सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमला ७०० ते ८०० रुपये आणि चांदीचे दर प्रति किलोला दीड हजार रुपयांनी कमी झाले होते. या दिवशी सोन्याचा (१० ग्रॅम) २८ हजार ९०० रुपये तर चांदीचा (प्रति किलो) ४१ हजार रुपये भाव होता. यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्याचे प्रत्यंतर सराफ बाजारात खरेदीसाठी झालेल्या गर्दीवरून पहावयास मिळाले. सराफी पेढय़ांत सोने-चांदी खरेदीत असणारा उत्साह रात्री उशिरापर्यंत कायम राहिल्याचे पहावयास मिळाले. टकले ज्वेलर्स, आर. सी. बाफना, राजमल लखीचंद, आडगावकर, नाशिकरोडस्थित दंडे ज्वेलर्स अशा बडय़ा पेढय़ांमध्ये चोख सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल राहिल्याचे पहावयास मिळाले. त्यात विशेषत: तुकडा, नाणे, वेढणी व बिस्किटांचा समावेश होता. अपेक्षेहून अधिक ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याची प्रतिक्रिया टकले ज्युएलर्सचे सतीश टकले यांनी सांगितले. नोटा बंदीनंतर सराफ बाजारावर मंदीचे सावट होते. या निमित्ताने ते बाजुला सारले गेल्याची आशा निर्माण झाली.

पंधरवडय़ात भाव काहिसे कमी झाल्यामुळे त्याचाही सकारात्मक परिणाम झाल्याचे टकले यांनी नमूद केले.

ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी गुंतवणूक म्हणून हा मुहूर्त साधण्याकडे बहुतेकांचा कल असला तरी यंदा त्याच्या जोडीला अलंकार खरेदीला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. आगामी दोन महिने लग्नसराईचे असल्याने या दिवशी सोने खरेदीला त्या ग्राहकांचाही प्रतिसाद मिळाल्याने काही सराफी व्यावसायिकांनी मान्य केले. चोख सोन्यासह अलंकार खरेदीसाठी प्रामुख्याने महिला वर्गाची गर्दी झाल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळाले. ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी सोडत, मजुरीत विशेष सूट, गृहोपयोगी भेटवस्तू, मजुरीवर निम्मी सवलत अशा वेगवेगळ्या योजना सराफ व्यावसायिकांनी मांडल्या.

प्रतिसादाने महोत्सवात आंब्याचीच टंचाई

अक्षय्य तृतीयेपासून आंब्याचा स्वाद चाखणाऱ्या ग्राहकांना यंदा चांगल्या हवामानामुळे मुबलक स्वरुपात आंबा उपलब्ध झाला आहे. पहिल्या दिवशी हापूसचा किलोचा भाव १२० ते १६० रुपये तर बदाम, राजापुरी व पायरी ५० ते ८० रुपयांच्या घरात आहे. कोकण पर्यटनतर्फे आयोजित आंबा महोत्सवास ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. एक हजार आंबा पेटय़ांची विक्री झाली. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आंबे खरेदी करताना ग्राहकांना काहिसा खिशावर अधिक भार द्यावा लागला.  पुढील काळात मुबलक आवक होणार असल्याने त्यांचे दरही कमी होतील. या वर्षी विविध प्रकारचे आंबे बाजारात उपलब्ध झाले आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीला जसे ग्राहकांकडून प्राधान्य दिले जाते, तसेच आंब्याचा स्वाद चाखण्याचाही हा हंगामातील पहिला दिवस मानला जातो. यामुळे फळांच्या बाजारात आंबे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली. अक्षय्य तृतीयेपूर्वी हापूस, लालबाग, पायरी, केशर, लंगडा, दशहरी असे विविध प्रकारचे आंबे बाजारात दाखल झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना योग्य पर्याय निवडण्याची संधी मिळाली. यंदा पोषक हवामानामुळे नेहमीपेक्षा आंब्याची आवक मोठय़ा प्रमाणात राहणार असल्याचा अंदाज आहे. बाजारात हापूस १२० ते १६० रूपये किलो, लालबाग ४० ते ५०, पायरी ५० रूपये, बदाम व राजापुरी ५० ते ७० रुपये किलो असे दर आहेत. कोकणातील हापूसचा आस्वाद देण्याकरिता अक्षय्य तृतीयेच्या पाश्र्वभूमीवर आयोजिलेल्या आंबा महोत्सवास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या दिवशीपर्यंत तब्बल एक हजार पेटय़ा आंबा विक्री झाल्याची माहिती संयोजक दत्ता भालेराव यांनी दिली. नैसर्गिकरित्या पिकविलेला आंबा महोत्सवास विक्रीला ठेवण्यात आला. पिकविलेला आंबा मोठय़ा प्रमाणात आणण्यात आला होता. परंतु, नंतर अशी वेळ आली की, एक पेटी घेणाऱ्या ग्राहकास एक डझन पिकलेले आंबे देऊन उर्वरित कच्चे आंबे घेण्याची विनंती करण्यात आली. ३०० ते ५५० रुपये डझन असे भाव असल्याचे भालेराव यांनी सांगितले.