हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलच्या ताब्यातील ओझर विमानतळाच्या संचलनाची जबाबदारी लवकरच भारतीय विमानतळ प्राधिकरण स्वीकारणार असताना आजवर विविध कारणांमुळे बंद पडलेली नाशिकची विमानसेवा पुन्हा नव्याने उड्डाण घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एअर इंडियाशी संलग्न असणाऱ्या अलायन्स एअर कंपनीने मुंबई-नाशिक-मुंबई सेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने (निमा) विमानसेवा सुरू करण्यासाठी खा. हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे.

साधारणत: तीन वर्षांपासून अधांतरी राहिलेल्या ओझर विमानतळाच्या भवितव्यास प्राधिकरणाने जबाबदारी स्वीकारल्यावर नवीन आयाम लाभणार असल्यावर अलीकडेच ‘लोकसत्ता’ने प्रकाश टाकला होता. हवाई नकाशावरील नाशिकचे अस्तित्व आणि ओझर विमानतळाची रडकथा सर्वश्रुत आहे. नाशिकहून मुंबईला विमानसेवा सुरू करण्याचे आजवर अगणित प्रयत्न झाले. परंतु, ते अयशस्वी ठरले. मध्यंतरी छोटेखानी विमानांद्वारे नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे अशी सेवा देण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी जादा भाडे असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, छोटय़ा विमानांद्वारे दृष्टिपथास आलेली सेवाही बंद पडली. नाशिक-मुंबई वा नाशिक-पुणे अशा थेट विमानसेवेऐवजी स्थानिक लोकप्रतिनिधी, उद्योजकांची निमा संघटना ‘हॉपिंग फ्लाईट’चा पर्याय मांडून त्या दृष्टीने पाठपुरावा करीत आहेत. प्रमुख महानगरांमधील विमान सेवेत नाशिकला थांबा मिळाल्यास शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल. शिवाय, देशभरातून शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांनाही त्याचा लाभ होईल, याकडे लक्ष वेधले जाते. या अनुषंगाने निमाने केलेल्या प्रयत्नांना अलायन्स कंपनीने प्रतिसाद दिल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. एअर इंडियाशी संलग्न असणाऱ्या या कंपनीने मुंबई-नाशिक-मुंबई सेवेसाठी तयारी दर्शवत योग्य ती वेळ देण्याची विनंती केली आहे. या घडामोडींमुळे नाशिकला हवाई नकाशावर पुन्हा नव्याने स्थान मिळणार असल्याची प्रतिक्रिया औद्योगिक वर्तुळात उमटत आहे.