भूसांस्कृतिक रुपात निर्मिती झालेला भारत हा जगात एकमात्र देश आहे. त्यामुळे संस्कृती संवर्धन आवश्यक ठरते. देशाच्या संस्कृतीने नेहमी जगाला मार्गदर्शन केले आहे. आक्रमकांना शरण न जाता विद्वान आणि पंडितांसमोर नम्र होण्यास शिकवणारी देशाची संस्कृती आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे भगवान ॠषभदेव यांच्या १०८ फूट उंच मूर्तीची पंचकल्याणक प्रतिष्ठापना आणि महामस्तकाभिषेक सोहळ्याअंतर्गत शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाजप बौध्दिक विकासाबरोबरच भारतीय संस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी प्रयत्न करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नातून १७० देशात जागतिक योगदिन साजरा होत असल्याचा दाखला शहा यांनी दिला. जगातील सर्व समस्यांचे समाधान भारतीय संस्कृतीत आहे. आपल्या देशातील जीवन पध्दती जीवनकल्याणचे मार्गदर्शन करणारी आहे. देशातील आध्यात्मिक विकासाला महत्व देताना समाजातील मूलभूत समस्या दूर करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मांगीतुंगीची ओळख एक सांस्कृतिक केंद्र म्हणून जगभर होण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही शहा यांनी दिली.
खा. सुभाष भामरे यांनी मांगीतुंगीचा पर्यटनक्षेत्र म्हणून विकास करण्यावर भर दिला. ज्ञानमतीजी यांनी भगवान ॠषभदेव यांची प्रतिमा केवळ जैन धर्माची ओळख न होता देशाची ओळख होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खा. रावसाहेब दानवे, खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. सीमा हिरे, दीपिका चव्हाण, श्याम जाजू, राजेंद्र पटणी, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, ज्ञानमती माताजी, रवींद्रकीर्ती स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.