अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांच्या हस्ते राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पैसा हे विनिमयाचे साधन असताना वस्तूचे स्वरूप येऊन भारतासारख्या देशात त्याच्या साठवणुकीची वाढती प्रवृत्ती ही बाब अनेक आर्थिक समस्यांचे कारण बनली आहे. शासनाच्या निश्चलीकरण निर्णयाची फळे लवकरच दृष्टिपथात येतील. नजीकच्या काळात जगातील अन्य बडी राष्ट्रेदेखील हाच प्रयोग करतील, असा दावा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी केला आहे.

येथे आयोजित लोकनेते व्यंकटराव हिरे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोकील यांनी अर्थव्यवस्था, निश्चलनीकरण याविषयी मत व्यक्त केले.

स्पर्धेत अपूर्वा मुंदडा व प्रसन्न बच्छाव यांचा सहभाग असलेला महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला.

अर्थव्यवस्थेतील रक्त समजल्या जाणाऱ्या चलनाचे काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद यासारख्या कारणांमुळे एक प्रकारे अभिसरण थांबले असल्याचे स्पष्ट करून निश्चलीकरणामुळे आता ही समस्या दूर होईल व देश प्रगतीकडे घोडदौड करेल, असा विश्वास बोकील यांनी व्यक्त केला.

भांडवलाअभावी तरूणांना उद्योग सुरू करता येत नाही. त्यामुळे तरुणांना व्याजविरहित वा अल्प व्याज दराने सुलभ पद्धतीने भांडवल उपलब्ध करून दिल्यास देशात रोजगार तसेच क्रयशक्ती वाढून देशाचा कायापालट होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सरचिटणीस डॉ. प्रशांत हिरे यांनी आर्थिक क्षेत्रात बोकील यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला.

या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष बी. के. देवरे, प्राचार्य डॉ. सुभाष निकम, प्राचार्य डॉ. उज्ज्वला देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक प्रा. डॉ. डी. व्ही. ठाकोर यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. रवी हिरे व प्रा. डॉ. प्रेमल देवरे यांनी केले. आभार प्रा. आर. व्ही. पाटील यांनी मानले.

मसगा महाविद्यालय विजेते

मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयातर्फे आयोजित २२ व्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेसाठी ‘विकासासाठी कर प्रणालीमध्ये बदल आवश्यक आहे का? ’ हा विषय ठेवण्यात आला होता. स्पर्धेत १२० जणांनी सहभाग घेतला. त्यासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू व अहिराणी या पाच भाषांमध्ये व्यक्त होण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. स्पर्धेत अपूर्वा मुंदडा व प्रसन्न बच्छाव यांचा सहभाग असलेला मसगा महाविद्यालयाचा संघ फिरत्या चषकाचा मानकरी ठरला. वैयक्तिक पातळीवर प्रवरानगर येथील पी. व्ही. पी. महाविद्यालयाचा विद्यार्थी तुषार गांगुर्डेने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. नामपूर महाविद्यालयाची स्वाती पाटील, मसगा महाविद्यालयाचा प्रसन्न बच्छाव यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. कनिष्ठ महाविद्यालयीन गटात वडेल येथील के.बी.एच. विद्यालयाची दामिनी बोरसे, मालेगाव हायस्कूलची अन्सारी बिबी मोहम्मद इस्माईल, नामपूर महाविद्यालयाचा किरण पगार हे अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. डॉ. आर. के. जाधव, सचिन पवार, डॉ. जे. एन. शिंदे, डॉ. सलीम मोईद्दीन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.