राष्ट्रीय रिपाइंचे नेते अण्णासाहेब कटारे यांचे आवाहन

महाराष्ट्रात जातीय संघर्षांचा आगडोंब उसळविणाऱ्या काही शक्तींच्या डावाला मराठा आणि दलित या दोन्ही समाजांनी बळी पडू नये, असे आवाहन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी केले आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा हा काही फक्त बौद्धांसाठीच नाही. मोर्चाला प्रतिमोर्चा यास आपला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पक्षाच्या नाशिक शहर व जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत कटारे यांनी आतापर्यंत युती-आघाडी केल्याने व नेहमीच प्रस्थापित पक्षांच्या वळचणीच्या राजकारणामुळे रिपब्लिकन पक्षाची स्वतंत्र ओळखच निर्माण होऊ शकली नाही, अशी व्यथा मांडली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळातील गतवैभव पुन्हा रिपब्लिकन पक्षाला प्राप्त करून देण्यासाठी आपला पक्ष मैदानात उतरला आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा वाचविण्यासाठी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या इतर घटकांनीही पुढाकार घ्यावा. आमचा त्यांना पाठिंबाच राहील, असेही कटारे यांनी नमूद केले. नाशिकमधील नांदुर नाका येथील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. बैठकीस जिल्हाप्रमुख नारायण गायकवाड, प्रदेश सचिव मनोहर दोंदे, शहराध्यक्ष बाळासाहेब साळवे, संपर्क प्रमुख राजन भालेराव आदी उपस्थित होते.