फटाक्यांच्या आतषबाजीने अवकाश उजळून निघत असताना अंगणातील मिणमिणत्या पणत्यांच्या प्रकाशानेही दीपोत्सवाला प्रकाशाची अनोखी किनार मिळत आहे. संगीत मैफलींसह अन्य काही सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून दीपोत्सवात विविध रंग भरले जात असताना त्याचा आनंद द्विगुणित करणाऱ्या लक्ष्मीपूजनासाठी व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिक उत्सुक आहेत. घरोघरी सोनपावलांनी येणाऱ्या लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी सारेच सज्ज असून त्यानिमित्त झेंडूची फुले, लक्ष्मीपूजनाचे साहित्य तसेच अन्य वस्तूंची खरेदी करण्यासाठी पूर्वसंध्येला बाजारपेठ गजबजली.
बुधवारी आश्विन अमावास्या अर्थात सायंकाळी लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी बाजारपेठेत झेंडूची फुले, रंगबेरंगी फुलांची तोरणे, लाह्य़ा, बत्तासे यासह व्यापारीवर्गाला लागणारी खतावणी, नोंदवही अन्य साहित्याने बाजारपेठ सजली. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करताना ग्राहकांची धावपळ होऊ नये यासाठी सर्व साहित्य एका छोटय़ा बॉक्समध्ये संकलित करून अवघ्या १५०-२०० रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये हळदी, कुंकू, पूजेसाठी लागणारे सप्तधान्य, अत्तर अन्य सामानासह लक्ष्मी म्हणून पूजल्या जाणाऱ्या केरसुणीचे प्रतिकात्मक रूप देण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी लक्ष्मीचे शाडू मातीचे मुखवटे कलशात सजविण्यात आले आहे. सजावट तसेच पूजेसाठी फुलांना असणारी मागणी पाहता फुलबाजारात झेंडूच्या फुलांनी शेकडय़ासाठी ओलांडली आहे. निशिगंध, मोगरा, शेवंतीची फुलांची जादा दराने विक्री होत आहे. या धामधुमीत व्यापारीवर्गही लक्ष्मीपूजनाच्या तयारीसाठी उत्सुक असून आजच्या संगणकीय युगात पारंपरिक पद्धतीने खतावणीपूजनाला प्राधान्य देत नव्या वर्षांचा श्रीगणेशा करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. व्यापाऱ्यांकडून खतावणीला असलेली मागणी पाहता लहान-मोठय़ा आकारातील बांधणीचे आवरण, लाल कापडात गुंडाळलेली, लक्ष्मी-सरस्वती-श्रीगणराय यांचे छायाचित्र असलेली अशा विविध खतावण्या तसेच नोंदवह्या बाजारपेठेत दाखल झाल्या आहे. व्यापाऱ्यांकडून खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधण्यासाठी सोने खरेदीला अग्रक्रम दिला आहे. दिवाळीनंतर सुरू होणारी लग्नसराई पाहता पारंपरिक तसेच अत्याधुनिक नक्षीकाम असलेले विविध घटनावळीत अलंकारांना ग्राहकांची मागणी आहे. काहींनी चोख सोन्याला पसंती देत वेढा किंवा बिस्किटासाठी आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याचा सातत्याने कमी होणारा दर पाहता लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी थेट खरेदीकडे अनेकांचा कल राहील, असे मत सराफांनी व्यक्त केले. यासाठी ग्राहकांना घटनावळीवर सुटीसह अन्य काही आकर्षक पर्याय देण्यात आले आहे. विविध योजनांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. तसेच, अन्य गृहोपयोगी वस्तू, सजावटीचे सामान, गृह, वाहन खरेदीलाही अनेकांनी पसंती दिली आहे.