इगतपुरी शहरातील स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढून देतो असे सांगून एटीएम कार्ड चोरून नेत तरुणाला ३ लाख २३ हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी, घोटीसह नाशिक येथील विविध बँकांच्या सीसी टीव्हीचा आधार घेत पोलीस चोरटय़ाचा शोध घेत आहेत.

इम्तियाज बाबूमिया पटेल (३६ रा. पिंप्रीसदो ) यांचे घोटी येथील स्टेट बँकेत बचत खाते आहे. पैसे काढण्यासाठी ते इगतपुरी शहरातील स्टेट बँकेच्या जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील एटीएम केंद्रात त्यांच्या लहान मुलांसोबत गेले होते. त्यावेळी २२ ते २५ वर्षे वयातील तरुण इतरांचे एटीएम यंत्रातून पैसे काढून देत होता. इम्तियाज पटेल यांनी देखील त्याच्याकडे एटीएम कार्ड देत ५ हजार रुपये काढून घेतले. दरम्यान, या चोरटय़ाने हातचलाखी करून त्याच्याकडे असलेले बनावट एटीएम कार्ड पटेल यांच्याकडे दिले आणि पटेल यांचे कार्ड स्वत:कडे ठेवले. पटेल निघून गेल्यानंतर चोरटय़ाने पटेल यांच्या एटीएम कार्डद्वारे इगतपुरी येथील एटीएममधून प्रथम ३५ हजार रुपये काढून बुलेटने पोबारा केला. त्यानंतर घोटी व नाशिक शहरातील स्टेट बँकेच्या विविध ८ शाखांतून दुपापर्यंत तसेच यंत्राद्वारे एकूण तीन लाख २३ हजार पाचशे रुपये काढून घेतले. दरम्यानच्या काळात बंद असलेला भ्रमणध्वनी सुरू केल्यानंतर त्यावर आलेले संदेश पटेल यांनी पाहिल्यानंतर ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.