बँकांसमोरील गर्दी, व्यवसायावरील परिणाम कायम

निश्चलनीकरणाच्या निर्णयास महिना पूर्ण होत असताना प्रशासन जिल्ह्यात मुबलक रोकड असल्याचे सांगत असले तरी आजतागायत बँकांसमोरील गर्दी कमी झालेली नाही. जिल्हा बँकेला नवीन चलन दिले जात नसल्याने खातेदार भरडले जात आहेत. महिनाभरानंतरही शहर व ग्रामीण भागातील बहुतांश एटीएम बंदच आहेत. सुटय़ा पैशांची अडचण कायम असल्याने बाजारपेठ आणि व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याची प्रतिक्रिया व्यापारी वर्गात उमटत आहे. पंतप्रधानांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे बहुतेकांनी स्वागत करत समर्थन केले होते. तथापि, आपलेच पैसे काढण्यासाठी वारंवार बँकेत खेटे मारावे लागत असल्याने त्यातील काहीकडून त्रस्तावल्याचा सूर उमटत आहे.

८ नोव्हेंबरला रात्री पंतप्रधानांनी ५०० आणि एक हजारच्या नोटा रद्दबातल होत असल्याचे जाहीर करत तो आता निव्वळ ‘कागज का टुकडा’ राहणार असल्याचे स्पष्ट केले. अकस्मात झालेल्या या निर्णयाने उडालेला गहजब आजतागायत शमलेला नाही. दरम्यानच्या काळात नवनवीन निर्णय घेतले गेल्याने गोंधळ कमी होण्याऐवजी वाढत गेला. जुन्या नोटा बँकेमार्फत बदलून घेण्याची व्यवस्था बंद झाली आहे. आता जुने चलन असल्यास ते बँकेत भरावे लागते. महिनाभरात सरकारी, खासगी व सरकारी बँकेत कोटय़वधी रुपये जमा झाले. प्रारंभीच्या काळात चलन तुटवडा भासल्याने सहकारी बँकांना नवीन चलन मिळवण्यासाठी अक्षरश: झगडावे लागले होते. बँकेतून आपले पैसे काढण्यासाठी आजतागायत रांगा लागलेल्या आहेत. पैसे काढण्यावर मर्यादा असल्याने बँकेत वारंवार खेटे मारावे लागत असल्याने नागरिक त्रस्तावले आहेत. ही मर्यादा पुढील महिनाभर कायम राहणार असल्याने स्थितीत बदल होणे अवघड आहे. काही बँकांमध्ये एकाच वेळी २४ हजार रुपये ग्राहकाला दिले जातात तर काही बँकांमध्ये चलन तुटवडय़ाचे कारण देऊन पाच ते सहा हजार रुपये काढता येतील, असे सांगितले जाते.

कृषिमालाचे भाव गडगडले असून तो खरेदी करताना जुन्या नोटा माथी मारल्या जातात. मजुरांना सुटे पैसे देण्यास अडचणी उद्भवत आहे. दुसरीकडे पगार, निवृत्तिवेतन काढण्यासाठी तासंतास बँकांमध्ये रांगेत उभे रहावे लागते. चलन तुटवडय़ामुळे बाजारपेठेतील व्यवहार थंडावले आहेत. खरेदीसाठी ग्राहक येण्याची प्रतीक्षा करावी लागते. बहुतांश व्यवसाय ठप्प झाल्यामुळे नाराजीचा सूर उमटण्यास सुरुवात झाली आहे.

अपवादात्मक बँकांचे एटीएम सुरू

जिल्हा प्रशासनाने बँक अधिकाऱ्यांची वारंवार बैठक घेऊन स्थितीवर नजर ठेवली. जिल्ह्य़ात या काळात आवश्यक त्या प्रमाणात चलनाची उपलब्धता झाली. मात्र, त्यात दोन हजारच्या नोटांचे प्रमाण अधिक असल्याने काही अपवादात्मक बँकावगळता उर्वरित बँकांचे एटीएम सुरू होऊ शकलेले नाही. प्रारंभी एटीएममधील तांत्रिक बदलामुळे ती बंद होती. आता पुरेसे चलन नसल्याने ती शोभेची बाहुले ठरली आहेत. एसबीआय व एक-दोन बँकांची विशिष्ट ठिकाणची एटीएम केंद्र सुरू आहेत. त्या ठिकाणी भल्या सकाळपासून रांग लागलेली असते. एटीएम केंद्र व बँकेतून अधिक्याने दोन हजाराच्या नोटा दिल्या जात असल्याने त्यांचा वापरही करता येत नाही. कारण, तितके सुटे देण्यासाठी व्यापारी वर्गाकडे सुटे चलन नाही. ग्रामीण भागात यापेक्षा विचित्र स्थिती आहे.