त्र्यंबकेश्वर परिसरातील घटना; संशयितांवर गुन्हे दाखल

कापड व्यावसायिक तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते विशाल गंगापुत्र यांच्यावर सोमवारी पहाटे संशयितांनी त्र्यंबकेश्वर परिसरात प्राणघातक हल्ला चढविल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जखमी गंगापुत्र यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त परिसरात गंगापुत्र यांचे कापडाचे दुकान आहे. गेल्या काही वर्षांपासून माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतात. माहिती मिळविण्यासाठी त्यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या अर्जामुळे अनेकांशी मतभेद झाले होते. अलिकडेच त्यांनी त्र्यंबक तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सांपत्तिक स्थितीची माहिती माहिती अधिकारात मिळविण्याचा प्रयत्न केला.

माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. यावरून त्यांचे काहींशी मतभेदही होते. प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असून संबंधितांवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी ते नाशिक येथे उपोषण करणार होते.

आंदोलनासाठी ते सोमवारी पहाटे नाशिकला येण्यासाठी निघाले असतांना पाच संशयितांनी त्यांच्यावर त्र्यंबकेश्वर परिसरात प्राणघातक हल्ला केला. त्यांच्याकडील महत्वपूर्ण कागदपत्रे, सीडी, पेनड्राईव्ह असे महत्वाचे दस्तावेज संशयितांनी लंपास केले. धारदार शस्त्राने पोटावर व पाठीवर वार करण्यात आले. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत त्यांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या हल्ल्यामागे ज्या कारणावरून ते आंदोलन करणार होते, त्याचा काही संदर्भ आहे काय याचा तपास केला जात आहे. गंगापुत्र यांनी आपल्या मागण्यांसाठीचे आंदोलन जिल्हा रुग्णालयातून केले जाणार असल्याचे म्हटले आहे. त्र्यंबक पोलीस ठाण्यात सायंकाळी उशीरापर्यंत संशयितांविरूध्द गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.