वन अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर पक्षीप्रेमी नाराज

वन विभागाच्यावतीने शनिवारी नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात आयोजित पक्षी गणना अवघ्या दोन तासात १५ हजार पक्ष्यांची नोंद करत कार्यक्रमाचे निव्वळ सोपस्कार पार पाडण्यात आल्याची तक्रार काही पक्षीप्रेमींनी केली आहे. नियोजित वेळेपेक्षा पक्षी गणनेला दीड तास उशिराने सुरूवात झाली. या बद्दल तक्रार करणाऱ्या पक्षीमित्रांना वन अधिकाऱ्यांनी उलट तुम्हाला कोणी बोलावले, तुम्ही का लवकर आलात असे प्रश्न विचारत अवमानित केले. या प्रकरणी पक्षी मित्रांनी संबंधित वन अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित वन अधिकाऱ्याने विलंब झाल्याचे मान्य करत निकषानुसार पक्षी गणना झाल्याचा दावा केला आहे.

gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
Police dressed as priests in Uttar Pradesh
अन्वयार्थ : पोलीस पुजारी.. की पुजारी पोलीस!
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…

वन विभागाच्यावतीने महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदुरमध्यमेश्वर परिसरात पक्षी गणना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी आठ वाजता शहर परिसरातून पक्षी मित्रांचे जथ्थे स्व खर्चाने त्या ठिकाणी दाखल झाला. या गणनेत अभयारण्यात यंदा कोणते नवीन पक्षी आले, कोणत्या प्रजातीचे पक्षी आहेत, संख्या याचा अभ्यास केला जाणार होता. पक्षी मित्र येऊन दिड तास झाला तरी वन अधिकाऱ्यांचा पत्ताच नव्हता. साडे नऊच्या आसपास सहाय्यक वन अधिकारी कोंडीबा शिंदे आल्यावर वन विभागाचे कर्मचारी सक्रिय झाले. मात्र तो पर्यंत दहा वाजल्याने आणि उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने अभयारण्यातील बहुतांश पक्षी इतरत्र निघून गेले होते, याकडे पक्षी मित्रांनी लक्ष वेधले. पक्षी मित्रांनी शिंदे यांना उशिरा येण्याचे कारण विचारले असता गाडी नसल्याने विलंब झाल्याचे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले. आम्ही गणनेची वेळ दिली नव्हती. मग तुम्ही इतक्या लवकर कसे आलात असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर पक्षी मित्रांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने आपण माफी मागतो, ज्यांना पक्षी निरीक्षण करायचे असेल त्यांनी यावे आणि बाकिच्यांनी जावे, असे सांगून टाकले. या घटनाक्रमामुळे काहींनी मागे फिरणे पसंत केले.

दरम्यान, पक्षी निरीक्षण कार्यक्रमात केवळ सहा पक्षी मित्र, सहा वन अधिकारी आणि सहा गाईड यांनी सहभाग घेतला. इतक्या मोठय़ा अभयारण्यात केवळ १८ जणांनी पक्षी गणना केली. आश्चर्याची बाब म्हणजे, त्यात केवळ गाईड आणि दोन-तीन पक्षी मित्र सोडले तर इतरांना पक्षी देखील ओळखता येत नव्हते. साडे अकरा वाजेपर्यंत अंदाजे बारा हजार पक्षी मोजल्याची नोंद केली गेली. अशा पध्दतीने पक्षी गणना केली गेल्यास त्यांचे संवर्धन धोक्यात येऊ शकते, अशी तक्रार नेचर क्लब ऑफ नाशिकने वन्यजीव संरक्षक विभागाच्या प्रमुखांकडे केली आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यास उपोषण छेडण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, भीमराव राजोळे, सागर बनकर आदींनी दिला आहे. दरम्यान, वाहन नसल्याने अभयारण्य परिसरात पोहोचण्यास काहिसा विलंब झाल्याचे शिंदे यांनी मान्य केले. त्याबद्दल सर्वाची आपण माफी मागितली. परंतु, एक पक्षी मित्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. इतर सर्व पक्षीमित्र गणना कार्यक्रमात सहभागी झाले. सर्व पक्षी कधी एकाच वेळी अभयारण्यात नसतात. त्यामुळे कोणत्याही वेळेत गणनेचे काम केले जाऊ शकते, असेही शिंदे यांनी नमूद केले.

पक्ष्यांच्या ६५ प्रजाती

दरवर्षी प्रमाणे करण्यात आलेल्या पक्षी गणनेत नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात ६५ प्रजातींचे १५ हजार ४१० पक्षी आढळून आले. त्यात पाणकावणे (४१०), करकोचा (११७), शराटे (९०), रोहीत (११), बदके (७९१२), क्राँच (७९६), कमळपक्षी (९३), शेकाटय़ा (१६३), गरूड (३), ससाणे (२१), खंडय़ा (२) इतर पक्षांचा अंतर्भाव आहे. गणनेसाठी एकूण सहा ठिकाणांची निवड करण्यात आली होती. या बाबतची माहिती सहाय्यक वनसंरक्षक शिंदे यांनी दिली.