होमिओपॅथी पदवीसाठी जुना, नवीन आणि ‘बीएचएमएस २०१५’ असे तीन प्रकारचे अभ्यासक्रम राबविण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ‘गोंधळात गोंधळ’चा प्रयोग पार पाडल्याचे दिसत आहे. एकाच वेळी तीन अभ्यासक्रम राबविणे जिकीरीचे होणार असल्याने गतवर्षी विद्यापीठाने अनुत्तीर्ण व परीक्षेस प्रविष्ठ न होणाऱ्यांना एकच अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, त्यामुळे आधीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट काही विषय ‘बीएचएमएस २०१५’ अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने द्यावे लागतील हे लक्षात आले. यामुळे होणाऱ्या गोंधळाची कल्पना आल्यानंतर विद्यापीठाने आधीचा निर्णय बदलला. आता ‘बीएचएमएस’ पदवीकरीता तीन अभ्यासक्रम लागू राहतील. अभ्यासक्रम व परीक्षा पध्दतीबाबत काही गोंधळ होऊ नये म्हणून उन्हाळी २०१७ परीक्षेपासून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून त्यांना लागू असलेल्या अभ्यासक्रम व परीक्षा पध्दतीबाबत ‘हमीपत्र’ भरून घेण्याची सावधगिरी बाळगली जाणार आहे.

राज्यात होमिओपॅथीची एकूण ४६ महाविद्यालये असून ‘बीएचएमएस’ अभ्यासक्रमात हजारो विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पदवी अभ्यासक्रमाविषयीच्या वेगवेगळ्या निर्णयांनी विद्यार्थी भांबावले आहेत. बीएचएमएस अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्यांना जुना आणि २०१३ मध्ये नवीन अभ्यासक्रम लागू होता. नंतर २०१५-१६ मध्ये ‘बीएचएमएस २०१५’ हा आणखी एक नवीन अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला. तो करताना एकाचवेळी तीन वेगवेगळे अभ्यासक्रम राबविणे जिकीरीचे होईल असे विद्यापीठाने गृहीत धरले. अभ्यासक्रमनिहाय प्रश्नपत्रिका संच तयार करणे, परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा पार पाडणे व प्रात्यक्षिक परीक्षेचे गुणदान यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन १५ डिसेंबर २०१५ रोजी झालेल्या विद्या परीषद बैठकीत जुना व २०१३ मधील नवीन या दोन अभ्यासक्रमांमध्ये अनुत्तीर्ण व परीक्षेस प्रविष्ठ न होणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बीएचएमएस २०१५’ हा एकच अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम व परीक्षा पध्दती हिवाळी २०१६ विद्यापीठ परीक्षेपासून लागू करण्याचे ठरले होते.

जुन्या व नवीन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ‘बीएचएमएस २०१५’ अभ्यासक्रम लागू करण्याच्या निर्णयाने वेगवेगळे प्रश्न निर्माण होणार असल्याची बाब प्राध्यापकांनी लक्षात आणून दिली. लागू केलेल्या अभ्यासक्रमाचे काही विषय आधीच्या अभ्यासक्रमात होते. यामुळे मागील अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम लागू करणे अयोग्य ठरणार असल्याकडे अध्यापकांनी लक्ष वेधले. दरम्यानच्या काळात या मुद्यावरून गोंधळ होवू नये म्हणून उन्हाळी २०१७ परीक्षेपासून अभ्यासक्रम व परीक्षा पध्दतबाबत विद्यार्थ्यांकडून हमीपत्र भरून घेण्याची सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना केली आहे. घाईघाईत घेण्यात आलेल्या आधीच्या निर्णयात विद्यापीठाला आता पुन्हा बदल करावा लागला आहे. नव्या निर्णयानुसार विद्यापीठाने जुन्या, नवीन २०१३ आणि ‘बीएचएमएस २०१५’ हे अभ्यासक्रम त्या त्या विद्यार्थ्यांसाठी कायम ठेवण्याचे निश्चित केले आहे. या बाबतची माहिती होमोओपॅथीक विभागाचे अधिष्ठाता डॉ. कविश्वर यांनी दिली. जुन्या व नवीन २०१३ या दोन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना बीएचएमएस २०१५ अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाणार नाही.

बीएचएमएस २०१५ हा अभ्यासक्रम २०१५-१६ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना लागू राहील. आपले काम सोपे करण्यासाठी एकच अभ्यासक्रम कायम ठेवण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न विद्यार्थ्यांसाठी अडचणी निर्माण करणारा ठरल्याचे घटनाक्रमावरून दिसत आहे.

कोणताही गोंधळ नाही

होमोओपॅथी पदवी अभ्यासक्रमांतील फेरबदलांमुळे कोणताही गोंधळ निर्माण झालेला नाही. विद्यार्थ्यांकडून आता हमीपत्र देखील भरून घेतले जाणार नाहीत. जुन्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांंना नवीन (२०१३) मध्ये आधीच समाविष्ट करण्यात आले. प्राध्यापकांनी ‘नवीन २०१३’ आणि ‘बीएचएमएस २०१५’ अभ्यासक्रमाविषयी काही बाबी निदर्शनास आणुन दिल्यानंतर त्या त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे आधीचे अभ्यासक्रम कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  डॉ. कविश्वर (अधिष्ठाता, होमिओपॅथिक विभाग)