भाजप इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात

पक्ष निधी वगळता निवडणुकीत किती द्रव्य खर्च करण्याची तुमची तयारी आहे.. तिकीट नाकारले तर पक्षाचे काम करणार आहात की नाही.. अथवा इतर पक्षाकडून उमेदवारी करणार आहात काय.. अशा विविधांगी प्रश्नांची सरबत्ती भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांवर झाली. महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, भाजपने इच्छुकांच्या मुलाखत प्रक्रियेला मंगळवारी सुरुवात केली. शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मुलाखती घेताना लावलेल्या कसोटय़ा व निकष इच्छुकांनी नंतर कथन केल्या. राज्यात व केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या भाजपकडे इच्छुकांची संख्या बरीच मोठी आहे. ही संख्याच एकाला तिकीट दिल्यानंतर बंडखोरीच्या रूपाने तापदायक ठरू नये, याची दक्षता समितीने उपस्थित केलेल्या प्रश्नांतून अधोरेखीत झाली. इतकेच नव्हे तर, नोटा बंदीने इच्छुकांच्या निवडणूक खर्चावर परिणाम होईल काय, याची अप्रत्यक्षपणे चाचपणी करण्यात आली.

महापालिकेच्या ३१ प्रभागातील १२२ जागांसाठी भाजपतर्फे ६९५ इच्छुक आहेत. संबंधितांच्या मुलाखत प्रक्रियेला भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात सुरुवात झाली. यावेळी उमेदवार, त्यांचे कुटुंबीय व समर्थकांच्या गर्दीने पक्ष कार्यालय चांगलेच गजबजले. शहराध्यक्ष आ. सानप यांच्या अध्यक्षतेखालील समितीत आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे आ. अपूर्व हिरे, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, प्रा. सुहास फरांदे आदींचा समावेश आहे. इच्छुकांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरण्याची मनिषा बाळगणारे, प्रभाग राखीव झाल्याने कुटुंबातील अन्य सदस्याला पुढे आणणारे आणि नव्यानेच पक्षात दाखल झालेले अशा सर्वाचा अंतर्भाव आहे. एकूण जागांपैकी निम्मी जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे पुरुष इच्छुकांच्या बरोबरीने महिला इच्छुकांची संख्याही मोठी आहे. यावेळी अनेकांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामांचा सचित्र अहवाल सादर केला. सुरूवातीला समिती सदस्यांनी प्रत्येकाला साधारणत: पाच मिनिटांची वेळ दिली. नंतर मुलाखतीचा वेळ हळूहळू आपसूक कमी होत गेला. मुलाखतीसाठी रांगेत बसलेल्या इच्छुकांसाठी साधी चहा-पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती. व्हरांडय़ातील मोकळ्या जागेत खुच्र्या टाकून संबंधितांना आसनस्थ करण्यात आले.

न्यायालयातील पुकाऱ्याप्रमाणे नावे पुकारून प्रत्येकाला मुलाखतीसाठी आतमध्ये सोडण्यात आले. काही प्रभागात एका जागेसाठी १२ ते १४ जण इच्छुक तर ज्या जागेवर भाजपचे नगरसेवक आहेत, तिथे इच्छुकांची संख्या काहीशी कमी म्हणजे पाच ते सातच्या दरम्यान असल्याचे यादीवरून दिसून आले. अनेकांना पहिलाच प्रश्न तिकीट मिळाल्यास खर्च करण्याची तयारी आहे काय, असा होता. बहुतांश इच्छुक तयारीनिशी आल्याचे उत्तरातून दिसले. त्यांनी लाखोंच्या आकडय़ात थेट आपली खर्चाची क्षमता सांगितली. किती वर्षांपासून पक्षात आहात, कोणती जबाबदारी सांभाळली, महापालिकेच्या कामकाजाबद्दलची माहिती, प्रभागाची लोकसंख्या, जात पडताळणी प्रमाणपत्र आहे काय, किती वर्षांपासून प्रभागात वास्तव्यास आहात, शिक्षण व इतर पाश्र्वभूमी जाणून घेण्यात आली. तिकीट न मिळाल्यास पक्षाचे काम सुरू ठेवणार काय, तुम्हाला तिकीट नाही दिले तर कोणाला द्यायला हवे, असे प्रश्न विचारत समितीने बंडखोरी होईल काय, याची चाचपणी केली. पहिल्या दिवशी १० प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखतीचे नियोजन होते. सकाळच्या सत्रात बराच कालापव्यय झाल्याने दुपारनंतरचे मुलाखतीचे सत्र काहिसे घाईघाईत पार पडले. नियोजित दहा प्रभागातील मुलाखती होतील की नाही, अशी साशंकता इच्छुकांमध्ये पसरली. पुढील दोन दिवसात टप्प्याटप्प्याने उर्वरित प्रभागांसाठीची प्रक्रिया पार पडणार आहे.