विनोद तावडे यांचा विश्वास; पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज दाखल करताना भाजपचे शक्तिप्रदर्शन

निवडणूक आयोगाने ३३ हजार बनावट मतदार आधीच रद्द केले असून त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणूक पारदर्शक होणार असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.   मकरसंक्रांत आणि त्यानंतर येणारा कर दिन टाळून नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी दोन उमेदवारांनी सोमवारचा मुहूर्त निवडला. त्यात भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने डाव्या व पुरोगामी पक्षाच्या वतीने प्रकाश (राजू) देसले यांचा समावेश आहे.

भाजपच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करताना संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, तावडे यांच्यासह खासदार व आमदार उपस्थित होते. अर्ज दाखल करताना भाजपने शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. तथापि, शिवसैनिकांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे पाहावयास मिळाले. नाशिकरोडच्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर शिखरेवाडी मैदानावर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या वेळी उत्तर महाराष्ट्रासह नगर जिल्ह्य़ातील आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. विधान परिषदेत भाजपला बहुमत नाही. त्यामुळे शासनाने कोणतेही चांगले निर्णय घेतले तर विधान परिषदेत त्याला विरोध होतो. विधान परिषदेत बहुमत प्राप्त करण्यासाठी ही जागा पक्षाला महत्त्वाची असल्याचे तावडे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी सांगितले.

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा भाजपचाच बालेकिल्ला होता. मध्यंतरीच्या पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसला मिळाली. तथापि, तो पुन्हा ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. पदवीधर मतदारसंघाच्या जुन्या यादीत जवळपास ३३ हजार बनावट मतदार होते. त्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली गेली. नवीन मतदार यादीत ते बनावट मतदारांची नावे वगळली गेली आहेत. यामुळे ही निवडणूक पारदर्शक होणार असल्याचे तावडे यांच्यासह इतर मंत्र्यांनी नमूद केले. दरम्यान, याच दिवशी डाव्या आघाडीच्या वतीने देसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपला अर्ज दाखल केला.