हेल्मेटच्या वापराविषयी जनजागृती करण्यात आता सत्ताधारी भाजपच्या मंडळींनी पुढाकार घेतला असताना दुसरीकडे या विरोधात काँग्रेसने स्वाक्षरी मोहीम हाती घेण्याची उपरती झाली आहे. हेल्मेटचा प्राधान्यक्रमाने वापर करावा, असे भाजपने म्हटले आहे. काँग्रेसने महामार्गावर हेल्मेट सक्तीला विरोध नाही, परंतु, शहरात ही सक्ती करू नका, अशी भूमिका घेतली आहे.

जवळपास आठ ते दहा महिन्यांपासून शहर पोलीस दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करावा, याकरिता जनजागृती व कारवाई करीत आहेत. हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनधारकांना आपली दुचाकी पोलीस आयुक्तालयात आणता येत नाही. वाहनधारकांना जो निकष तोच पोलीस कर्मचाऱ्यांना लावला गेल्याने आयुक्तालयाच्या बाहेर हेल्मेट परिधान न करता पोलिसांकडून चालविली जाणारी दुचाकी वाहने दृष्टिपथास पडतात. दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट परिधान करावे, यासाठी आजवर पोलिसांनी विविध उपक्रम राबविले.

या मोहिमेला आता सत्ताधारी भाजपच्या मंडळींनी बळ दिले आहे. हेल्मेट जनजागृती फेरीचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, आ. बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत झाले. या फेरीत शासकीय अधिकारी, विद्यार्थी मोटार सायकल रायडिंग क्लब, विविध संस्था सहभागी झाल्या. पोलीस कवायत मैदानापासून सुरू झालेली फेरी गंगापूर रस्ता, कॉलेज रोड, त्र्यंबक रोडमार्गे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर तिचा समारोप झाला. रस्ते अपघातापासून सुरक्षिततेसाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन महाजन यांनी केले.

भाजपने हेल्मेट वापरण्याचे आवाहन केल्यावर काँग्रेसने त्यास विरोध सुरू केला आहे. मुळात गेल्या काही महिन्यांपासून पोलीस हेल्मेटची सक्ती करीत आहेत. आजवर या मुद्दय़ावर मौन बाळगणाऱ्या काँग्रेसने हेल्मेट सक्तीच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली. हेल्मेट सक्तीच्या नावाखाली नागरिक व विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. या निषेधार्थ शहर काँग्रेस सेवादलाने स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ केला. शहरातील अरुंद रस्त्यांवर हेल्मेट परिधान करून वाहन चालविताना कसरत करावी लागते. यामुळे ही सक्ती केवळ महामार्गावर केली जावी, हेल्मेट सक्तीच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरू नये, याकरिता स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आल्याचे सेवा दलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमास माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, डॉ. हेमलता पाटील आदी उपस्थित होते.