सभापतिपदासाठी नव्या-जुन्यांच्या वादाची चिन्हे

महापालिकेतील सत्ताधारी भाजपला स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी केलेली व्यूहरचना सेना व रिपाइं गट नोंदणीचा प्रस्ताव फेटाळला गेल्यामुळे निष्प्रभ ठरल्याचे चित्र आहे. या स्थितीत शिवसेनेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला असला तरी सध्याच्या तौलनिक बळाचा विचार करता भाजपच्या स्थायी सभापतीचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे. स्थायी सभापतीपदावर डोळा ठेवत भाजपमधील नव्या-जुन्या सदस्यांनी कंबर कसली असताना दुसरीकडे विरोधी पक्षांतही मिळणाऱ्या जागेवर आपली वर्णी लावण्यासाठी नगरसेवक कामाला लागले आहेत.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

स्थायी समितीत नेमके कोणाकोणाला स्थान मिळणार याची निश्चिती बुधवारी रात्री अथवा गुरुवारी सकाळपर्यंत होणार आहे. विभागीय आयुक्तांनी फेटाळलेल्या प्रस्तावावरून सेना उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहे. न्यायालयीन घडामोडींकडे भाजपसह इतर विरोधकांचे लक्ष आहे. १२२ सदस्यांच्या पालिकेत भाजपचे ६६, शिवसेना व आरपीआय ३६, काँग्रेस सात, राष्ट्रवादी सात, मनसे सहा अशा प्रकारच्या गट नोंदणीनंतर संख्याबळ बदलणार होते. अशी नोंदणी करून विरोधकांनी सत्ताधारी भाजपचे स्थायीचे गणित बिघडविण्याची तयारी केली. प्रतीस्थायी सदस्य नियुक्तीसाठी ७.६२५ चा कोटा आहे. यानुसार भाजपचे सर्वाधिक आठ, सेनेचे पाच, काँग्रेस एक, राष्ट्रवादी एक व मनसेचा एक या प्रकारे स्थायीतील १६ सदस्यांची विभागणी होणार होती.

यात सत्ताधारी व विरोधकांचे संख्याबळ समसमान होऊन चिठ्ठी पध्दतीने सभापतीची निवड क्रमप्राप्त ठरणार होते. सत्ताधारी भाजपचे बहुमत चुकविण्यासाठी केलेली व्यूहरचना विभागीय आयुक्तांच्या निर्णयाने दुरावली आहे. सेनेने ३५ आणि रिपाइंचा एक असे एकूण ३६ सदस्यांच्या गट नोंदणीचा दिलेला प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी निकाली काढला. हा प्रस्ताव देण्याआधी सेनेने आपल्या पक्षाची नोंदणी केली असल्याने आणि नंतर नव्याने प्रस्ताव दिल्याचे नमूद करत सेना-रिपाइं आघाडीचा प्रस्ताव निकाली काढण्यात आला. भाजपने प्रशासनावर दबाव टाकल्याचा आरोप करत या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचे सेनेने जाहीर केले आहे. गुढी पाडव्यामुळे सुटी असल्याने मंगळवारी सेनेला न्यायालयात दाद मागता आली नाही. बुधवार हा एकमेव दिवस त्यांच्या हाती आहे. उपरोक्त निर्णयामुळे स्थायीतील विरोधकांचे समीकरण विस्कळीत होणार आहे. सध्याच्या तौलानिक बळानुसार भाजपचे ६६, सेना ३५, काँग्रेस ६, राष्ट्रवादी ६, मनसे पाच, अपक्ष ३ आणि रिपाइं एक असे संख्याबळ आहे. या पक्षांची स्वतंत्र गटनोंदणी झाल्यास प्रतीस्थायी सदस्य नियुक्तीसाठीच्या कोटय़ाचा विचार केल्यास भाजपचे सर्वाधिक नऊ, सेनेचे पाच, काँग्रेस व राष्ट्रवादी असे मिळून दोन सदस्य अशा १६ जागांची विभागणी होईल. यामुळे स्थायीवर भाजपचा सभापती होईल, असे चित्र आहे. या एकंदर घडामोडींमुळे विरोधी पक्षात अस्वस्थता पसरली आहे. भाजपला आव्हान देण्याच्या दृष्टीने केलेली खेळी यशस्वी ठरली नाही.

गुरुवारी सकाळी ११.३० वाजता स्थायी समिती सदस्य निवडीकरिता विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. तत्पूर्वी सकाळी १०.३० वाजता गटनेत्यांची बैठक होईल. त्यावेळी प्रत्येक पक्षाला विहित निकषानुसार आपल्या सदस्यांची नावे द्यावी लागतील.

अखेरच्या टप्प्यातील घडामोडींना वेगळी कलाटणी मिळाल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. स्थायी सभापतीपदावर विराजमान होण्यासाठी नव्या-जुन्यांसह अनेकांनी कंबर कसली आहे. आधीच नवीन व जुने यांच्यात वेगवेगळ्या कारणांवरून मतभेद आहेत. स्थायी सदस्य आणि सभापतीपदाच्या उमेदवाराची निवड करताना पक्षाच्या नेत्यांना सर्वाना सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे. विरोधी सेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे आडाखे तूर्तास अधांतरी बनले आहे.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]