आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप
भाजपच्या मंडल अध्यक्ष निवडीवरून पक्षांतर्गत मतभेद उफाळून आले असून सिडकोत या पदाची निवड करताना आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करत नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी प्रदेशाध्यक्षांकडे धाव घेत त्यास स्थगिती देण्याची मागणी केली. या संदर्भात कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांकडे सादर करत या निवडीला शहराध्यक्षांना जबाबदार धरले आहे. तथापि, हे आरोप तथ्यहीन असून पक्षाच्या घटनेनुसार सिडकोसह मंडलनिहाय अध्यक्षांची निवड करण्यात आल्याचा दावा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी केला. या घडामोडींमुळे पक्षातील गटबाजी प्रकर्षांने अधोरेखित झाली असून जुने आणि नवीन असा वेगळाच संघर्ष सुरू झाला आहे. पक्षाची वाढलेली सदस्यसंख्या नेत्यांसह जुन्या कार्यकर्त्यांसाठी डोकेदुखी ठरल्याचे अधोरेखित होत आहे.
भाजपच्या मंडल अध्यक्ष निवड प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या उपरोक्त घटनेमुळे शहराध्यक्ष विरुद्ध लोकप्रतिनिधी या थेट संघर्षांचा नवीन अध्यायही सुरू झाला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर इतर पक्षांतून भाजपमध्ये दाखल होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले. पुढील काळात पक्षातर्फे राष्ट्रीय पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सदस्यता नोंदणी अभियान राबविले गेले. त्या अंतर्गत शहरात दोन लाख ७० हजार सदस्यांची नोंदणी झाली आहे. १०० सदस्य करणाऱ्यास सक्रिय सदस्य केले गेले. या प्रक्रियेत सर्व यंत्रणा कामाला जुंपून सदस्य वाढविणाऱ्यांनी पक्षाच्या महत्त्वपूर्ण पदांवर लक्ष केंद्रित केल्याचे लक्षात येते. महिनाभरापासून नाशिक शहर मंडल अध्यक्ष आणि शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. मंडल अध्यक्ष निवडीला सिडको व सातपूर मंडलापासून सुरुवात झाली. मात्र, सिडको मंडल अध्यक्ष निवडीवेळी पक्षाचे कित्येक वर्षांपासून काम करणारे पदाधिकारी आणि नव्याने झालेले सक्रिय सदस्य यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले. शिक्षक आमदार डॉ. अपूर्व हिरे यांचे समर्थक असलेल्या गिरीश भदाणे यांच्या निवडीची घोषणा झाल्यावर आ. हिरे यांनी त्यास विरोध दर्शविला. निवड जाहीर करून पदाधिकारी निघून गेल्यावर आ. हिरे यांनी समर्थकांसह ठिय्या आंदोलन केले. पैसे घेऊन पक्षाशी संबंध नसलेल्या आणि काम न करणाऱ्याची सिडको मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचा आरोप आ. हिरे यांनी केला. शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यासाठी जबाबदार आहेत. ज्यांची संबंधितांनी निवड केली, त्यांना कधी कोणी पाहिलेले नाही. भाजपच्या त्र्यंबकेश्वर येथील कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला ते उपस्थित नव्हते.

निवड एकमताने
मंडल अध्यक्ष जनतेत काम करणारा असणे आवश्यक आहे. त्यांच्या कामातून पक्षाची प्रतिमा निर्माण होईल. या वास्तवाकडे डोळेझाक करत सावजी यांनी शहराध्यक्षपदाच्या अखेरच्या टप्प्यात पक्षांतर्गत दुही निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रक्रियेत आर्थिक व्यवहार झाल्याची बाब मुंबईत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन निदर्शनास आणून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात शहराध्यक्ष सावजी यांनी सिडको मंडल निवडीवरून झालेले आरोप फेटाळून लावले. पक्ष विस्तारत असताना जुने आणि नवे अशा सर्वाना घेऊन पुढे मार्गक्रमण करावयाचे आहे. सर्वसमावेशक विचार करून आदर्श संहितेनुसार निवड केली जात आहे. अनेक मंडलात चार ते पाच, कुठे त्याहून अधिक इच्छुक आहेत. सिडको मंडलात पक्षाचा एकही नगरसेवक नाही. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन पक्षाच्या सात ते आठ पदाधिकाऱ्यांनी एकमताने प्रदेश कार्यालयाच्या संमतीनंतर योग्य व्यक्तीची निवड केल्याचे सावजी यांनी नमूद केले. या संदर्भात प्रतिक्रियेसाठी आ. अपूर्व हिरे प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.