सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनाला घरचा आहेर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात पंधरा दिवस राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याचे प्रशस्तिपत्रक देतानाच दुसरीकडे मोकाट कुत्रे, डुकरे आणि इतर जनावरांच्या वाढत्या संख्येवरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.  विविध तक्रारी मांडत महापौर व सभागृह नेत्यांनी आरोग्य विभागासह इतर विभागांच्या कामाचे वाभाडे काढले. प्रशासनाने काम करण्याची मानसिकता ठेवावी असे बजावत दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर, कार्यप्रवण राहण्याचे निर्देश दिले.

शहरात राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी आरोग्य विभागाचे सभापती सतीश कुलकर्णी, सभागृह नेते दिनकर पाटील, स्थायी सभापती शिवाजी गांगुर्डे उपस्थित होते.

पालिकेत वेगवेगळी सत्ताकेंद्र निर्माण होऊन परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रकार वाढल्याचे निदर्शनास आल्यावर पालकमंत्र्यांनी दिलेल्या कानपिचक्यांचा परिणाम बैठकीत दृश्य स्वरुपात पहावयास मिळाला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी परस्परांचा मान राखला. पण, आरोग्य विभागासह इतर विभागांच्या कामाचे वाभाडे काढण्यात कसर ठेवली नाही. त्यातून सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्याचे अधोरेखित झाले. बैठकीत एका बाजुला कौतुकाची थाप अन् दुसरीकडे कामांतील अनियमितेबद्दल तक्रारींचा पाऊस पाडण्याची करामत भाजपने केली. आरोग्य विभागाच्या कामकाजातील सुधारणा पुढील काही महिन्यात पाहावयास मिळतील. उघडय़ावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे आरोग्य सभापती कुलकर्णी यांनी सूचित केले.

स्वच्छता मोहिमेत सातत्य राखण्याची गरज आहे. सफाई कामगारांना अद्याप गणवेश दिले गेले नाही. बूट, हातमोजे व मास्कही दिला जात नाही. साफसफाईचे काम करणाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे पाटील यांनी नमूद केले. आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. इतर विभागातील अतिरिक्त २६१ कर्मचारी या विभागात वर्ग करण्यास आयुक्तांनी मान्यता देऊनही हा विषय का रखडला, असा प्रश्न त्यांनी केला. अनेक भागात उघडय़ावर मांस विक्री होते. त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्या हल्ल्यात लहान मुले-नागरिक जखमी होतात.  मोकाट जनावरांविषयी तक्रारी करूनही अधिकारी दाद देत नाही. निर्बीजीकरणावर दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च होऊनही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी डुकरे पकडण्याचा प्रायोगिक तत्त्वावर महिनाभर प्रयोग झाल्याचे सांगत पकडलेले डुकरे त्यांचे मालक घेऊन गेल्याचे नमूद केले. डुकरे पाळणाऱ्यांवर कारवाईची सूचना करण्यात आली. काही अधिकारी आपली बाजू मांडत असताना सभागृहनेत्यांनी तुमच्यावर विश्वास नाही असे सांगून त्यांना शांत केले. महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गोदा काठावरील कलशाबाहेर कचरा पडू नये म्हणून आपण कर्मचारी ठेवले आहे. परंतु, ते देखील बाहेर पडलेला कचरा कलशात टाकत नाही. संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी. अनेक ठिकाणी भुयारी गटारी तुंबल्या असून ढापे देखील नाहीत.

दिवाळीत साफसफाईसाठी महिलांना पाण्याची गरज आहे. या काळात पाणी पुरवठा सुरळीत राखण्याची आवश्यकता आहे. त्यासंबंधी कोणतेही कारण ऐकले जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावले.

कचरा संकलनातील करामत

पंचवटीत एका दिवशी ४०० कर्मचाऱ्यांनी तीन टन कचरा उचलला तर कधी केवळ १०० कर्मचाऱ्यांनी एका दिवशी दोन टन कचरा उचलला. पूर्व प्रभागात २१५१ कर्मचाऱ्यांनी नागरिक व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पंधरवडय़ात १०० टन कचरा संकलित केला तर नाशिकरोड प्रभागात ७८७ कर्मचाऱ्यांनी ५६ टन कचरा उचलला. अशी वेगवेगळी आकडेवारी सादर करत प्रशासनाने स्वच्छता मोहीम यशस्वी झाल्याचे दाखले दिले. या सर्व आकडेवारीवर नजर टाकल्यास कधी ४०० कर्मचारी तीन टन कचरा उचलताना दिसतात तर कधी १०० कर्मचारी केवळ दोन टन कचऱ्याचा भार पेलतात. दर दिवशी वापरले गेलेले मनुष्यबळ आणि संकलित केलेला कचरा यातून स्वच्छता मोहिमेतील गमतीजमती सहजपणे लक्षात येतात. या कालावधीत नाशिक पश्चिम विभागात ७८ टन, नवीन नाशिकमध्ये ६० टन, पूर्व प्रभागात १०० टन, नाशिकरोड ५६ टन, पंचवटीत १४० टन आणि सातपूर विभागात १०२ कचरा संकलित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp official slam nashik municipal administration over growing of stray dogs and pigs in city
First published on: 04-10-2017 at 03:16 IST