मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी भाजप व शिवसेनेत युती करण्याविषयी चर्चा सुरू असली तरी नाशिक महापालिकेत मात्र या दोन्ही पक्षांमध्ये युती होणार नसल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपने महापालिकेच्या सर्व जागांवर इच्छुकांच्या मुलाखतीला सुरुवात करत सेनेशी युती करण्याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इच्छा नसल्याचे म्हटले आहे. भाजपच्या पवित्र्याने आधीपासून स्वबळावर लढण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेने आगपाखड केली. या घडामोडींमुळे मुंबईसह राज्यात उभय पक्षांमध्ये युती झाली तरी नाशिकमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.

केंद्र व राज्यात सत्ताधारी असणाऱ्या सेना-भाजप या पक्षांतील वितुष्ट दिवसागणिक वाढत आहे. दोन्ही पक्षांकडून परस्परांना लक्ष्य करण्याची संधी दवडली जात नाही. विधानसभा निवडणुकीनंतर उभय पक्ष सर्वच निवडणुका स्वबळावर लढविण्यावर भर देत आहेत. या घडामोडीत मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने वेगळा विचार सुरू झाला. मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ती ताब्यात घेण्यासाठी भाजपने धडपड चालविली आहे. या निवडणुकीत सेना-भाजप युती व्हावी, यासाठी राज्यपातळीवर चर्चा सुरू असताना नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपने त्यादृष्टिने शिवसेनेला विचारातही घेतलेले नाही. पालिकेच्या निवडणुकीची तयारी भाजपने आधीपासून चालविली आहे. मागील निवडणुकीत भाजपने सेनेला झिडकारत स्वबळाचा प्रयोग केला होता. त्यावेळी १४ जागा पदरात पाडणारा भाजप आज देशात व राज्यात सत्ताधारी आहे. गेल्या काही महिन्यांत या पक्षांकडे येणाऱ्यांचा ओघ लक्षणीय वाढला आहे. या सर्वाचा लाभ पालिका निवडणुकीत घेण्यासाठी भाजपने इच्छुकांच्या मुलाखत प्रक्रियेचा श्रीगणेशा केला. मुंबईसह राज्यात कुठेही भाजप व शिवसेनेशी युती झाली तरी नाशिकमध्ये ती होणार नसल्याचे भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी स्पष्ट केले. स्थानिक कार्यकर्त्यांची सेनेशी युती करू नये, अशी भावना आहे. ही भावना लक्षात घेऊन भाजप सर्वच्या सर्व जागांवर मुलाखती घेत आहे. सेनेशी युती करण्याबाबत भाजपने आधी प्रयत्न केले. परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

भाजपच्या या भूमिकेवर सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी जुने संदर्भ देत आगपाखड केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय देतील, तो सेनेला मान्य आहे. शहरातील सर्व जागा स्वबळावर लढून त्या जिंकण्याची ताकद शिवसेनेत असल्याचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले. भाजपचे मुख्यमंत्री युतीची भाषा करतात, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवरील नेते स्वबळाची विधाने करतात. स्थानिक भाजप नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगत सेनेने स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.