पोलिसांची कुठेही अकस्मात तपासणी

महापालिका निवडणूक निर्भय व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली असून या काळात प्रथमच अकस्मात तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी एक लक्ष्य निश्चित करून ही कारवाई केली जाईल. त्या अंतर्गत कधी हॉटेल तर कधी निवासगृह अर्थात लॉजची तपासणी, कधी चारचाकी वाहने तर कधी दुचाकी वाहने, कधी नाकाबंदी होईल. विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करत सुरक्षाकवच पुरविणाऱ्या ‘बाऊन्सर’च्या कार्यपद्धतीवर पोलिसांनी आधीच र्निबध घातले आहेत. निवडणूक काळात पीळदार शरीरयष्टीच्या ‘बाऊन्सर’चा वापर उमेदवारांकडून होऊ नये यासाठी पोलिसांनी जीम चालकांना सूचना दिल्या आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, पोलिसांनी कृती आराखडा तयार केला असून त्यानुसार कारवाई सुरू होत आहे. मागील पाच वर्षांत विविध निवडणुकांमध्ये गुन्हे दाखल असणारे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणारे घटक रडारवर आहेत. त्या अंतर्गत ६३६ जणांवर वेगवेगळ्या स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे. त्यात २०० हून अधिक राजकीय नेते व कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. ही मंडळी कोणत्या राजकीय पक्षांची आहे याची स्पष्टता अद्याप झालेली नाही.

शहरातील १३ पोलीस ठाण्यांमार्फत प्रतिबंधात्मक कारवाई सुरू होत आहे. त्यात एमपीडीए अंतर्गतचे चार, मोक्कांतर्गत कारवाई झालेले दोन आदींचा अंतर्भाव आहे. आचारसंहिता काळात अकस्मात तपासणी मोहीम राबविला जाणार असल्याची माहिती उपायुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली. हॉटेल, ढाबे, लॉज, चारचाकी व दुचाकी तपासणीची अकस्मात मोहीम राबविली जाईल. एका दिवशी एक लक्ष्य निश्चित करून ही कारवाई करण्यात येणार आहे. शहरात आठ प्रवेश मार्ग आहेत. त्या मार्गावर नाकाबंदी करून कारवाईचे नियोजन आहे.

मागील काही वर्षांत विविध कार्यक्रमांत पीळदार शरीरयष्टी असणारे आणि विशिष्ट स्वरुपाचा पेहराव करणाऱ्या ‘बाऊन्सर’चा संचार ठळकपणे समोर येताना दिसतो. बाहुबली राजकीय नेते आणि काही गुन्हेगारी मंडळी अशा खासगी बाऊन्सरच्या सुरक्षा कवचात फिरताना दृष्टिपथास पडायची. संबंधितांचा हा संचार सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण करणारा असल्याचे लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वी ‘बाऊन्सर’च्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत पोलिसांनी त्यावर प्रतिबंध आणले होते. निवडणुकीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे दबाव टाकण्यासाठी ‘बाऊन्सर’चा उमेदवारांकडून वापर केला जाऊ शकतो.

ही बाब लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने निवडणूक काळात ‘बाऊन्सर’चा दबाव तंत्रासाठी वापर केला जाऊ नये याची तयारी केली आहे. त्या अनुषंगाने शहरातील विविध जीम आणि व्यायामशाळांना पत्र देऊन सूचित करण्यात आले आहे. निवडणूक काळात अशा पेहेरावात भ्रमंती करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘बाऊन्सर’ला कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.